Satara News: लोकसभा 2024 ची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक कामाला लागले आहेत. अद्याप कोणत्याच पक्षाच्या इच्छुकांचे तिकीट कन्फर्म नसले तरी तयारीला लागले आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक आम्ही आशावादी असल्याचे सांगत पायाला भिंगरी लावून मतदारसंघावर दावा करत पिंजून काढू लागले आहेत. या आम्ही आशावादी म्हणणाऱ्यात आता कोणाच्या आशेवर पाणी फिरणार अन् कोण बाजी मारणार हे तिकिट वाटपानंतरच समजणार आहे. (Loksabha Election 2024)
सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार निश्चित नसले तरी इच्छुकांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. महायुतीतून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले भाजपाकडून, सातारा लोकसभा मतदारसंघातून दोनदा नशीब आजमावलेले शिवसेनेचे (शिंदे गट) पुरूषोत्तम जाधव यांनी आपण तिकिटबाबत आशावादी असल्याचे सांगत मतदारांच्या भेटी घेवू लागले आहेत.
तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा सातारा लोकसभा मतदारसंघ हक्काचा असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, ते अजितदादांच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीतून (शरद पवार गट) 'मी राष्ट्रवादी मी आशावादी' या वाक्याप्रमाणे तीन नवे तरूण चेहरे तयारीला लागले आहेत. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे नांव पुन्हा चर्चेत आहे. शरद पवार गटातून नव्या चेहऱ्यात खासदारपुत्र आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांचे नाव आघाडीवर असून जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांचेही नाव इच्छुकांच्यात घेतले जात आहे.
या तीन इच्छुकांच्यात सारंग पाटील यांनी आपल्या वडिलांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन, उद्घाटनासाठी गेल्या 5 वर्षात गावोगावी भेटी दिल्या आहेत. आतातर प्रत्येक ठिकाणी कार्यपूर्ती दौरा जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी करू लागले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातून नावे चर्चेत आहेत, त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. परंतु, या मागणीला अजून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कोणताही सिग्नल मिळत नाही. लोकसभेसाठी नाव चर्चेत असले तरी चव्हाण हे इच्छुकही नाहीत अन् आशावादीही नसल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.