Kolhapur News : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेने मोठी मजल मारली आहे. एकेकाळी सहा आमदार असलेल्या जिल्ह्याने दोन्ही खासदार दिले आहेत. सतत सत्ता बदल झाल्यानंतर आणि शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ॲक्शन मोडवर ठेवले आहे.
या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election News) भाजपच्या वरिष्ठ आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा दबाव असताना शिंदे यांनी दोन्ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केला अन् त्यात यशस्वी झाले.
महाविकास आघाडीत शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडून दिली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ज्या ठाकरे गटाने वारंवार भाजपचे मिंधे असे हिणवले, तेच शिंदे आता कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र आहे. मानपानात कोणीही दुखावू नये, याची काळजी स्वतः मुख्यमंत्री घेताना दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांनी ठोकलेला तळ आणि आमदार प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यापासून ते धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत आमदार आवाडे यांना घेऊन येण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची धडपड लक्षात येते.
कोणत्याही परिस्थितीत संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि माने या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिसत आहेत. दोन दिवसांपासून त्यांनी मध्यरात्री केलेली धडपड हीदेखील लक्षणीय आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी दुपारपासून रविवारी पहाटे साडे पाचपर्यत जिल्ह्यात गाठीभेटी घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारच्या दौऱ्यांतही हाच पॅटर्न वापरला. त्यांनी माजी आमदार महादेवराव महाड़िक यांच्या पुलाची शिरोली येथील बंगल्यात अड़ीच तास ठिय्या मारत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठीच्या संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी फिल्डिंग लावली.
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या नागाळा पार्कमधील निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर ते थेट पुलाची शिरोली येथील महाडिक यांच्या निवासस्थानी गेले. शिंदे यांनी स्वतंत्र बैठका सुरू करत धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह नगरसेवकांसोबत एक बैठक झाली. यानंतर शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी भेटून चर्चा केली.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मध्यरात्री भेट घेऊन सूत्रे हलवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय कालच्या भाषणातदेखील 'ये तो अब ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है' असं म्हणत विरोधकांनांच आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या धडपडीमुळे दोन्ही उमेदवारांमध्येही नक्कीच शंभर हत्तींचे बळ आले असेल. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा उत्साहही द्विगुणित झाला असेल. मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे केल्याचे या धडपडीतून स्पष्ट झाले आहे.
(Edited By - Rajanand More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.