Madha Loksabha Political News : भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, पण निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोधकांपेक्षा महायुतीतील धुसफूस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गट अधिक आक्रमक झाला आहे.
थेट उमेदवारच बदला, अशी मागणी करत या निंबाळकरांविरोधी गटाने केल्यामुळे महायुतीचे शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच त्यात लक्ष घालावे लागले, पण तरीदेखील अद्याप या मतदारसंघातील वादावर तोडगा निघालेला नाही. अशातच आता माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील विजयाची स्ट्रॅटजीच सांगून टाकली आहे.
माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीला अजित पवार गटाकडून जोरदार विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वीच सागर बंगल्यावर रामराजेंची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी महायुतीचा धर्म पाळवा, अशी सूचना रामराजेंना केली होती. त्यावर रामराजेंनी नकार देत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून निर्णय घेऊ, असे सांगितले होते.
माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी टेंभुर्णीत सोमवारी झालेल्या (ता.25)कोअर कमिटी आणि क्लस्टर समिती सदस्यांच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मला मदत केलेले लोक नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. माढातील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.
ज्यांच्यामध्ये थोडा गैरसमज आहे तो दूर होईल. सर्वात जास्त चर्चेत माढा लोकसभा मतदारसंघ असला तरी सर्वात जास्त विकासदेखील याच मतदारसंघात झालाय. सर्वांना बरोबर घेऊनच ही लढाई लढणार आहोत. जे नाराज असतील त्यांना तर मी उमेदवार म्हणून भेटणार आहेच, शिवाय पक्ष ज्यांना भेटायला सांगेल त्यांनाही मी भेटणार आहे, असेही ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निंबाळकर म्हणाले, गेल्या वेळी आपल्यासमोर अनेक मोठी आव्हाने होती. मात्र, आता महायुतीची ताकद, पूर्वीचे सहकारी पक्ष आणि आता राष्ट्रवादीही सोबत आली आहे. पूर्वीची महायुती आणि आजची महायुती यात बदल झाले आहेत. पूर्वी आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो.
आता नंतर या महायुतीत राष्ट्रवादी सामील झाली आहे. राष्ट्रवादीच्या येण्याने ताकद वाढली आहे, असं भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले. तसेच एकसंधपणे महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
लवकरच महायुतीमधील सर्व पक्षांशी चर्चा करून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीला या वेळी माढाचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) , माजी आमदार प्रशांत परिचारक , सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते , रश्मी बागल यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचे प्रमुख उपस्थित होते.
भाजपकडून मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारीसाठी डावलण्यात आले आहे. त्यामुळे मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यामुळे त्यांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मागील 40 वर्षांपासून जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे. आता मोहिते पाटील यांनी माढ्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे जानकर-मोहिते पाटील एकत्र आल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.