Mahabaleshwar Election : महाबळेश्वरवर 20 वर्षे वर्चस्व ठेवलेल्या आघाडीची पिछेहाट : राष्ट्रवादीने टाकलाय टॉपचा गिअर

Mahabaleshwar Election : महाबळेश्वर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि विविध आघाड्यांत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार, गटबाजी आणि प्रभागनिहाय संघर्षामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.
mahabaleshwar-municipal-election-2025, Ncp, Makarnad Patil
mahabaleshwar-municipal-election-2025, Ncp, Makarnad PatilSarkarnama
Published on
Updated on

Mahabaleshwar News : महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीमुळे थंड हवेच्या ठिकाणचे तापमान चांगलेच वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर भाजपने देखील कमळ चिन्हावर खाते खोलण्यात यश मिळवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जुन्या राजकारणातील लोकमित्र जनसेवा आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास पसंती दाखवली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने गिरिस्थान नगरविकास आघाडी जाहीर केली. त्‍यामुळे सर्वच पक्षांनी येथील पालिकेच्‍या सत्तेसाठी अक्षरश: उड्या घेतल्‍या असल्‍याने चुरशीच्‍या लढतीत बाजी कोणाची? याचा निर्णय मात्र मतदारांच्‍या गुलदस्‍त्‍यातच राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे यांच्यासह सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उतरवले आहेत. इतर पक्षांना ते शक्य झाले नसले, तरी त्‍यांनी निर्माण केलेले आव्‍हानही तगडे ठरणारे आहे. राष्‍ट्रवादीपाठोपाठ अपक्ष उमेदवारांची संख्‍या अधिक दिसत असून, गिरिस्थान नगरविकास आघाडीच्या माध्यमातून दोन, तीन जागा सोडल्या, तर सर्व ठिकाणी उमेदवार निश्चित करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार, माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चुरस निर्माण केली आहे.

गेली दोन दशके महाबळेश्वरवर प्राबल्‍य दाखवणाऱ्या लोकमित्र जनसेवा आघाडीची मात्र यावेळी पीछेहाट दिसत आहे. डी. एम. बावळेकर यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली केवळ 5 जागांवर आघाडीचे उमेदवार उभे करण्यात ते यशस्वी झाले आहेत, तर भाजपलाही ऐनवेळी माजी सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली तीन उमेदवारांवर आपले खाते उघडल्याचे समाधान मानावे लागले आहे.

mahabaleshwar-municipal-election-2025, Ncp, Makarnad Patil
Rahimatpur Election : भाजपने समीकरण फिरवलं.. खासदार, मंत्र्यांनी ताकद देऊनही 'राष्ट्रवादीच्या' गडाला हादरे

मातब्‍बर युसूफ शेख

रांजणवाडी व गादळवाडीचे वर्चस्व असलेल्या प्रभाग एक (अ) मध्‍ये राष्‍ट्रवादीने माजी नगराध्यक्ष युसूफ शेख यांच्‍यासोबत महाबळेश्वर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शरद बावळेकर यांच्या पत्नी विद्या बावळेकर यांच्‍यारूपाने नवा चेहरा देत सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमित्र जनसेवा आघाडीने शंकर ढेबे यांना संधी दिली आहे, तसेच अपक्ष उमेदवार राजमोहम्मद नालबंद व प्रियांका बावळेकर या अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने गिरिस्थान नगरविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे, तसेच नावेज बडाणे व झीनत चौगुले या देखील मैदानात आहेत.

आखाडे आमने-सामने

प्रभाग दोनमध्‍ये जय दुर्गामाता सोसायटीसह रांजणवाडीच्या काही परिसराचा या प्रभागात समावेश आहे. या प्रभागात पूर्वी प्रशांत आखाडे यांच्या पत्नी सुरेखा आखाडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता वाडकर यांच्या पत्नी संगीता वाडकर या दोघी एकत्र नगरसेविका होत्या. यावेळी मात्र प्रभागातून शिवसेना गटातून प्रशांत आखाडे व त्यांच्यासोबत सोनाली बांदल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वाडकर व माजी उपनगराध्यक्ष संतोष आखाडे यांच्याविरोधात आव्हान देत आहेत. लोकमित्र जनसेवा आघाडीने माजी नगरसेविका मंगल काळे यांचा मुलगा किरण काळे यांना प्रथमच संधी दिली आहे. आसिफ शेख हे देखील येथे नशीब आजमावत आहेत.

मामीला भाचीचे आव्‍हान

प्रभाग तीनमध्‍ये राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष विमल पार्टे यांच्यासह माजी नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांचे चिरंजीव विशाल तोष्णीवाल यांना मैदानात उतरवले. याच प्रभागातील माजी नगरसेवक भाजपचे माजी सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे यांनी पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निकटवर्तीय, उद्योजक हेमंत साळवी व पूजा उतेकर या नव्‍या चेहऱ्यांना मैदानात उतरविले आहे. पूजा उतेकर या विमल पार्टे यांचीच भाची असल्याने प्रस्थापितांविरोधात येथे घमासान होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

mahabaleshwar-municipal-election-2025, Ncp, Makarnad Patil
Pachgani News : मकरंदआबांना तगडी फाईट; लक्ष्मीताई राष्ट्रवादीविरोधात पदर खोचून मैदानात

प्रभाग चार हा नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांचा बालेकिल्‍ला असून, त्यांनी स्वतः नगरसेवकपदी देखील आपला अर्ज ठेवला आहे. त्यांच्याविरोधात लोकमित्र जनसेवा आघाडीने बाळकृष्ण साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसने संजय साळुंखे यांच्यासह वंदना ढेबे यांना, तर अपक्ष म्हणून कुमार शिंदे यांचे सख्खे बंधू किरण शिंदे यांनी अर्ज दाखल केल्याने मतविभागणी कोणाच्‍या पथ्‍यावर? हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. कुमार शिंदे यांनी विमल बिरामणे व शर्मिला वाशिवले या दोघींचे नाव आघाडीमधून जाहीर केल्याने नेमकी परिस्थिती काय? हे निकालावेळीच स्पष्ट होईल.

बंडखोरीचे ग्रहण

प्रभाग पाच हा शहराचा मध्यवर्ती भाग असून, पंधरा वर्षांपेक्षा जास्त वेळ नगरसेवक राहिलेले संदीप साळुंखे व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील यांना राष्ट्रवादीने थांबवून ॲड. संजय जंगम यांच्यासह अतुल सलागरे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका अपर्णा सलागरे यांना संधी दिली आहे. पक्षवाढीबरोबर नवीन जुन्याचा समन्वय साधण्याचा पक्षाचा प्रयत्न येथे यशस्वी ठरेल का? हे पुढे दिसून येईल. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी पुन्हा लोकमित्र जनसेवा आघाडीतून आपली उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे, तर शिवसेनेने प्रभा नायडू यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) डावलल्याने नाराज झालेले प्रकाश पाटील यांनी त्यांची वहिनी स्मिता पाटील यांना अपक्ष उभे केल्याने राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. प्रभाग सहामध्‍ये माजी नगरसेवक संतोष शिंदे यांनी लोकमित्र जनसेवा आघाडीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत उषा कोंडके यांच्‍यासह पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन दिले आहे, तर शिवसेनेने नीता झाडे व राहुल भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्‍ट्रवादी (शप) कडून दुर्वेश प्रभाळे यांनी, तर मनोहर जाधव यांनी देखील आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.

mahabaleshwar-municipal-election-2025, Ncp, Makarnad Patil
Wai Politic's : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अरुणादेवी की नवीन चेहरा; गोरेंसमोर गळ्यात गळे घालणारे पिसाळ-ननावरे काय करणार?

जाऊबाईंचे आव्‍हान

प्रभाग सातमधून राष्ट्रवादीने नासीर मुलाणी यांच्यासह तरुन्नुम वलगे यांना, तर शिवसेनेने (Shivsena) अपक्ष उमेदवार सलीम बागवान व शबाना मानकर यांना जाहीर केले आहे. येथे त्यांचेच एकेकाळचे जवळचे मित्र सलीम बागवान यांनी शिवसेनेच्या आघाडीमधून त्यांच्या पुढे आव्हान निर्माण केले आहे. आठमधून शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व माजी नगरसेविका संगीता गोंदकर यांना संधी दिली असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेवक संजय पिसाळ यांचे बंधू राहुल पिसाळ व प्रियांका वायदंडे यांना संधी दिली आहे. स्वप्नाली शिंदे यांच्या जाऊ शुभांगी शिंदे यांनीही येथे आव्हान उभे केले आहे.

नवख्यांचे आव्‍हान

प्रभाग नऊमध्‍ये राष्ट्रवादीने माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार यांच्यासह रेश्मा ढेबे या नव्‍या चेहऱ्याला संधी दिली आहे, तर शिवसेनेने संगीता हिरवे व मोझ्झम नालबंद या दोन्ही नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे. लोकमित्र जनसेवा आघाडीकडून आशिष चोरगे यांना उमेदवारी जाहीर केली असून, मेघा ढेबे या अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावणार आहेत.

प्रभाग दहामध्‍ये राष्ट्रवादीने माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांचे चिरंजीव रोहित ढेबे यांच्यासह लोकमित्र जनसेवा आघाडीचे माजी नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर यांची सून पल्लवी कोंढाळकर यांना पक्षात प्रवेश घेऊन संधी दिली आहे. भाजपने मनीष मोहिते व अश्विनी ढेबे यांना संधी देत प्रभागात आपले अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेने माजी नगरसेविका सुनीता आखाडे यांना पुन्हा संधी दिली आहे. विनोद गोळे व सीमा तोडकर अपक्ष म्‍हणून जनमत आजमावणार आहेत. लोकमित्र आघाडीने सुनीता ढेबे यांना संधी देत प्रभागात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com