

Maharashtra CET setting scam: नीट पेपर फुटीच्या प्रकरणाने देशभरात गदारोळ आणि दिल्लीच्या जंतर-मंतरवर ३६ दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. या घडामोडी घडत असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठीच्या सीईटी परीक्षेत ९९ पर्सेंटाईल मिळवून देण्याची गॅरंटी एका खाजगी क्लास चालकाकडून देण्यात आल्याचा कथित ऑडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
१२ ते १३ लाख रुपये द्या तुमच्या मुलाला सीईटीत ९९ पर्सेंटाईल मिळवून देऊ, त्यासाठी आम्ही सांगू त्या सेंटरवरच परीक्षा द्यावी लागेल, तिथे आमची सेटिंग आहे, असा दावा छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानुर मिया दर्गा परिसरातील एका खाजगी क्लासच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी मोबाईल वरील संभाषणातून केला आहे.
या कथित ऑडिओने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वैद्यकीय असो की अभियांत्रिकी क्षेत्राचे प्रवेश यामध्ये खाजगी संस्थाचालकांचा हस्तक्षेप किती वाढला आहे आणि त्यातून प्रामाणिक अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिक्षण क्षेत्र उध्वस्त करायला निघालेल्या या रॅकेटचा कायमचा बंदोबस्त करा, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच नीट पेपर फुटीच्या प्रकरणाने देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धती किती बरबटलेली आहे हे समोर आले. रात्रंदिवस अभ्यास करून वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा देणाऱ्या आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर या पेपर फुटीमुळे पाणी फिरले गेले.
देशभरात २२ हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवून घेतले. यातून विद्यार्थ्यांनी एक मोठा लढा उभा केला. दिल्लीत थेट संसदेवर धडक देत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यावरच हे आंदोलन थांबले.
मात्र पेपर फुटीचे हे जाळे किती खोलवर रुजलेले आहे याचा अनुभव दिल्लीतील आंदोलन संपत नाही तोच पुन्हा आला. सीईटी परीक्षेमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाईल मिळवून देण्यासाठी १२ ते १३ लाख रुपये पालकांकडून उकळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा चीड आणणारा प्रकार एका ऑडिओ क्लिपने समोर आला आहे.
विशिष्ट परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थी चांगले मार्क्स कसे मिळवून देऊ शकतो हे सांगत सीओईपी आणि व्हीजेटीआय यांसारख्या नामांकित महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष विद्यार्थी आणि पालकांना दाखवले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील एका खाजगी संस्थाचालकाच्या कार्यालयातून श्रीरामपूर येथील एका पालकाला फोन करण्यात आला होता. यावेळी झालेल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
पैसे द्या, पाहिजे ते कॉलेज मिळवा..
या कथित क्लिप मध्ये क्लास चालक पालकाला "आम्ही ९९ पर्सेंटाईल आणण्याची गॅरंटी देतो, फक्त आम्ही सांगू त्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्या आणि पाहिजे ते सरकारी महाविद्यालय मिळवा, असे क्लास चालक सांगत आहे. सीईटी मध्ये आपण ९९ पर्सेंटाईल आणून देतो, मॅनेजमेंट आमचं असतं, विद्यार्थ्याला फक्त तिथे जाऊन परीक्षा द्यायची आहे.
विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर येईपर्यंत एक रुपया सुद्धा द्यायला लागत नाही. सरकारी महाविद्यालय जे आहेत त्या मध्ये सीओइपी आहे, वीजेटीआय आहे किंवा इतर मुंबई, पुण्यातील कॉलेज आहेत, जी ब्रँच हवी आहे त्याचा रेट १२ ते १३ लाख रुपयांपर्यंत जातो," असं या क्लिप मध्ये क्लास चालक पालकाला सांगत असल्याचं समोर आलं आहे.
या ऑफरवर संबंधित पालकाने माझी एवढी कुवत नाही, माझ्या मुलाला जेईईमध्ये ६६पर्सेंटाईल मिळाले होते. मी फार तर एक दोन लाख रुपये, खर्च करू शकतो असे सांगत तयारीही दाखवली. यावर आम्ही मग तुम्हाला फक्त कौन्सिलिंग करू शकतो असे संस्था चालक महिला कर्मचाऱ्याने संबंधित पालकांना सांगितले.
आपला मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा, जर विचार बदलला तर निश्चित संपर्क करा. असेही ही महिला त्या पालकाला सांगत असल्याचे संभाषणात स्पष्ट झाले आहे. या ऑडिओ क्लिपने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) निकालाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या क्लिपमुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.