
Kolhapur Politics : माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या भाषणांमधून सातत्याने सरकारमधील मंत्र्यांना धारेवर धरत असतात. यावेळीही त्यांनी मंत्र्यांचा उल्लेख जहागीरदार करत सरकारलाही घरचा आहेर दिला आहे. आत्ताचे मंत्री जहागिरदार सारखे वागतात. ते मंत्री राज्याचे नव्हे तर त्यांच्या मतदारसंघाचे मंत्री आहेत. आपल्याच मतदारसंघातील कामातून डोकं वर काढायला या मंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका खोत यांनी केली आहे.
कोल्हापुरात मीडियाशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली. ते म्हणाले, अलीकडच्या राजकारणात मातीपेक्षा जाती श्रेष्ठ झाल्या. माझ्या खात्याला निधी कमी पडला, इथे निधी कमी पडला, तिथे निधी कमी पडला, असेच सुरू आहे. ज्याला खाते चालवायला कळत नसेल तर सांगावं, आम्ही चालवू. काही लोक मंत्री झाले की अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात. सध्याच्या सरकार मधल्या मंत्र्यांचा तोरा वाढला आहे. मंत्र्यांमधला आणि सरकार मधला बेबनाव अशा गोष्टींमध्ये समोर येतोय.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, शरद जोशींनी ज्या विचारांची पेरणी केली. तो पुढे घेऊन जाणार, कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला पदे मिळाली पण आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही. निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांचा विचार घेऊन जाऊ. काही लोकांना वाटत की माझ्यामुळे सगळे आहे, ढगफुटी माझ्यामुळे झाली. पण सर्वांमुळे सर्व असते हे त्यांना ठाऊक नाही.
अनेकांनी चळवळीत जीव ओवाळून टाकला, केसेस घेतल्या, त्यांच्या रक्तातून चळवळ उभी राहिली आहे. ते कोणत्या अपेक्षेने आले नव्हते. सदाभाऊला पद मिळाले म्हणून बाजूला झाला, अशी अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण वस्तूस्थिती वेगळी आहे. पद मिळवायचे असते तर सदाभाऊंनी खूप काही केले असते. मुंडे साहेबांच्या घरात बसलो असतो, त्यावेळी माढातून लोकसभेची ऑफर आली होती. त्याच वेळी कमळ हातात घेतले असते तर आज माढामधील खासदार असतो, पण संघटनेकडून त्यावेळी लढलो. आम्ही चळवळ आणि कार्यकर्त्यां जपण्याचा प्रयत्न केला, असा निशाणा खोत यांनी राजू शेट्टींवर साधण्यात आला.
चळवळ टिकली पाहिजे, माझ्यासाठी राहिली पाहिजे, अशीच एका नेत्यांची भूमिका आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. निवडणूक आली की चळवळ टिकली पाहिजे म्हणायचं. सदाभाऊंच्या मागे माणसे नाहीत म्हणणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. मला आमदार करून देवाभाऊंनी दाखवून दिले, त्यांच्याशिवाय सदाभाऊ आमदार होऊ शकतो, असा खोचक टोला देखील खोत यांनी लगावला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण करत खोत म्हणाले, माणिकराव कोकाटे हे आतापर्यंतचे सर्वात संवेदनशील कृषिमंत्री आहेत. कोकाटे हे इंडियाचे नाही तर भारतातले कृषिमंत्री, त्यामुळे ते रांगडी भाषेत बोलतात, असे सांगत खोत यांनी कोकाटे यांच्या अनेक वादग्रस्त विधानांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.