
सांगली जिल्ह्यात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांमध्ये जोरदार लढत रंगली आहे.
निशिकांत पाटील यांनी जिल्ह्यातील काही माजी आमदार, भाजप पदाधिकारी यांना राष्ट्रवादीत आणत पक्षवाढ केली.
इस्लामपूर, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शहरी भागांत दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होणार असून जिल्ह्यात कडवी राजकीय लढत होण्याचे संकेत आहेत.
Who will dominate Sangli politics in 2025 elections: आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये कांटे टक्कर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या या बालेकिल्ल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताकद दिल्यानंतर निशिकांत पाटील जोरदार हादरे देताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगलेच रमले आहेत. जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयासाठी चांगलेच झुंजवले. कृष्णा कारखान्याच्या ऊसाच्या बिलापासून ते जयंत पाटील यांच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक बारक्या गोष्टींवर काम करत त्यांनी टफ फाईट दिली.
त्यानंतर सांगली जिल्ह्याची सारी सूत्र निशिकांत पाटील यांच्याच हातात आली. पक्षवाढीसाठी ते मनापासून प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. गावोगावी संपर्क अभियानासाठी फिरत असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसून येते. महिन्याभरापूर्वीच निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे तिघेजण राष्ट्रवादीत गेले.
शिवाजीराव नाईक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या उपप्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि संजयकाका पाटीलही नावाला का होईना पण राष्ट्रवादीसोबत आहेत. पाटील यांनी पक्ष वाढवताना मित्रपक्षांचेही बंधन ठेवलेले नाही. नुकतेच आटपाडी आणि जतमधील 30 हून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे.
निशिकांत पाटील यांच्या या प्रयत्नांमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी स्पर्धेतही नसणारा राष्ट्रवादी पक्ष आता जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी वाढती डोकेदुखी बनला आहे. शिवाजीराव नाईक यांच्या रुपाने शिराळ्यात माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासमोर घरातीलच मोठं आव्हान निर्माण झाले आहे.
इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा हक्काचा बालेकिल्ला. पण तिथेच त्यांचे मताधिक्य कमी करून निशिकांत पाटील यांनी नॅरेटिव्हची लढाई जिंकली. आता तासगाव-कवठेमहांकाळमध्ये संजयकाका आणि अजित घोरपडे यांना सक्रिय करण्याचे मोठे आव्हान निशिकांत पाटील यांच्यासमोर आहे. दुसऱ्या बाजूला सांगली आणि मिरज या शहरी भागात आमदार इद्रीस नायकवडी काम करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवा आमदार रोहित पाटील, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते फक्त शरद पवार या नावाासाठी लढायला तयार आहेत. पण सध्याच्या घडीला राजकीय गणितं पाहिली असता शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवारच वरचढ होताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समित्या येथे लढत रंतदार होईल हे निश्चित
प्रश्न: सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या दोन पक्षांमध्ये संघर्ष आहे?
उत्तर: जयंत पाटील (शरदचंद्र पवार) विरुद्ध निशिकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस).
प्रश्न: निशिकांत पाटील यांची जिल्ह्यातील राजकारणात कोणती भूमिका आहे?
उत्तर: ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व बनले असून अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्या गटात सामील झाले आहेत.
प्रश्न: जयंत पाटील यांचा प्रमुख मतदारसंघ कोणता आहे?
उत्तर: इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.