

Sangli BJP News: सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी योग्य मान-सन्मान राखला नसल्याच्या कारणावरुन सांगलीतील भाजप नगरसेवक नाराज आहेत. सोमवारी (8 जून) सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित होते. मनधरणी करताना मंत्री पाटील यांनी नाराज झालेल्यांना थेट मुख्यमंत्र्यांकडेच समजावण्यासाठी पाठवतो असा इशारा दिला.
"महायुतीसाठी ही विधानपरिषद निवडणूक एकतर्फी आहे, महायुती एकसंध आहे, तसेच मतदारांनी एकसंध राहावे. काही कुरबुरी असतील तर त्या नीट करू, नाराजी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दूर करतील. मुख्यमंत्री माणसांना समजवण्यात तरबेज आहेत, कुटुंबातील रक्ताच्या माणसांमध्येही मतभेद असतात. त्यावेळी कुटुंबप्रमुख हे मतभेद दूर करत असतो. तसेच महायुतीमध्ये काही मतभेद असतील, नाराजी असेल तर ती दूर होईल. कोणीतरी मध्यस्थी केल्यावर नाराजी दूर होते. त्या-त्या पक्षाचे नेते नाराजी दूर करतील." असे नाराज नगरसेवकांची मनधरणी करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
जागतिक परिणामांमुळे महागाई:
या बैठकीत मंत्री पाटील यांनी जागतिक महागाईवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, "जगावर प्रभुत्वासाठी जागतिक राजकारण सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून इंधन संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावध राहण्याचे आवाहन केले होते. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधन महागले. परिणामी वस्तूंचे दर वाढले आहेत."
विधानपरिषदेसाठी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप उमेदवार व अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हे तीनही उमेदवार सातारा जिल्ह्यातील असल्याने सांगली जिल्ह्यातील मतदारांशी त्यांचा फारसा परिचय नाही.
अशातच आता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी निवडणूक अर्ज भरतेवेळी झालेल्या बैठकीत सांगलीतील नगरसेवकांकडे दुर्लक्ष केल्याच्या समजुतीतून सांगलीतील भाजपचे नगरसेवक चांगलेच नाराज झाले. उमेदवार नगरसेवकांना नमस्कार करत नसतील तर आम्हीही मतदान का करू? अशा मानसिकतेत भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी करण्यात महायुतीला यश येतं का हे पाहणं महत्वपुर्ण ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.