
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत 25 वर्षे गोकुळ दूध संघाची सत्ता टिकवून ठेवणाऱ्या महाडिक गटाला मंत्री मुश्रीफ-पाटील गटाने हादरा देत तब्बल सतरा जागांवर विजय मिळविला. महाडिक गटाचे केवळ चार उमेदवार विजयी झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने इतिहास रचत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील सत्तेला सुरूंग लावला होता.
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाडिक विरोधकांची मोट बांधत पाटील-मुश्रीफ गटाने गोकुळमध्ये सत्तापरिवर्तन केले. मात्र, आता पुढील वर्षात होणाऱ्या गोकुळची पंचवार्षिक निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय धुरळा उडणार असून अनेकजण मुश्रीफ-पाटील गटातून फुटण्याच्या मार्गावर आहेत.
गोकुळच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत सरकार स्थापन केल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी गट्टी करत महाडिक गटाला धक्का दिला. इतकेच नव्हे तर महाडिक गटाचे प्रमुख शिलेदार गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अध्यक्ष अरुण डोंगळे हे देखील महाविकास आघाडीत दाखल होत पंचवीस वर्षे सत्ता असणाऱ्या महाडिक गटाला सुरुंग लावला.
जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील पाटील-मुश्रीफ गटाला ताकद दिली. पण आता जिल्ह्यासह राज्यातील राजकीय दिशा बदललेली आहे. राज्यातील राजकारणाचे पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. अशावेळी गोकुळ दूध संघात सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची गट्टी कायम असली तरी आगामी गोकुळच्या निवडणुकीत कोणत्याही क्षणी त्याला तडा जाण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची इच्छा नसली तरी त्यांच्यावर राजकीय दबाव वाढवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडून गोकुळ दूध संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी व्युहरचना आखली जात आहे. मागील पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुलाच्या खालून बरेच पाणी वाहिले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत.
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सोबत असणाऱ्या अनेक प्रमुख नेत्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. शिवाय राजाराम सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक न लढवण्याचा शब्द दिल्यानंतरही आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक लढवल्याने आमदार विनय कोरे देखील नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकीला कोरे यांच्याकडून सतेज पाटील यांना मदत होईल, त्याची शक्यता कमीच आहे.
सध्यातरी गोकुळ दूध संघातील संचालकांची परिस्थिती पाहता मागील वेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले संचालक सध्या महायुतीमध्ये आहेत. त्यामध्ये अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, किसन चौगुले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, रणजीत पाटील, नंदकुमार डेंगे, करणसिंग गायकवाड, एस, आर पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, अमर पाटील, यांचा समावेश आहे. तर गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, अंबरीष घाटगे, बाळासाहेब खाडे, आणि चेतन नरके यांनी महाडिक गटातून निवडणूक लढवली होती.
अभिजित तायशेटे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडकर यांनी पाटील-मुश्रीफ गटासोबत निवडणूक लढवली, पण सध्या हे महाविकास आघाडीतचे नेते सतेज पाटील यांच्यासोबतच आहेत. मागील पाच वर्षांत संचालक चेतन नरके, बाळासाहेब खाडे हे सतेज पाटील यांच्यासोबत आले आहेत. पण सध्याचे राजकीय स्थिती पाहता गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जवळचे आहेत.
आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके हे देखील शिवसेनेत आहेत. तर माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी देखील नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. अंबरीश घाटगे यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, रणजीत पाटील, नंदकुमार डेंगे, किसन चौगुले, कर्णसिंग गायकवाड हे मुश्रीफ यांच्या जवळचे आहेत. तर अमर पाटील हे विनय कोरे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या भूमिकेवरच या संचालकांची भूमिका अवलंबून आहे.
गेल्या पाच ते दहा वर्षात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने महाडिक विरोधकांची मोट बांधत गोकुळ काबीज केले. मात्र या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा सूफडा साफ झाला. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने वरिष्ठ स्तरावरून गोकुळ दूध संघाच्या बाबतीत जो निर्णय होईल, तोच महायुतीच्या नेत्यांना लागू पडणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना देखील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेने सोबत राहावे लागणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे नेतृत्व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक करणार असल्याने मुश्रीफ यांना त्यांची साथ द्यावी लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या निर्णयावरच महायुतीची भूमिका गोकुळच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.