

Satara, 19 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडमधील नेते ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांंची, तर उपाध्यक्षपदी फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. उंडाळकर यांच्या निवडीमुळे उपमुख्यमंत्री (स्व) अजित पवार यांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी पूर्ण केला आहे.
ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी १९ एप्रिल २०२५ रोजी कराड (जि. सातारा) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या सभेत बोलताना अजितदादांनी ॲड उदयसिंह उंडाळकर यांना उद्देशून ‘उदयसिंहांनी घेतलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत चुकू देणार नाही. त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची ताकद देण्यात येईल,’ असा शब्द दिला होता. त्यावेळी मकरंदआबा हे अजितदादांसोबत व्यासपीठावर हजर होते.
अजितदादांनी जाहीर सभेत दिलेला शब्द मकरंद पाटील यांनी त्यांच्या पश्चात पाळला आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आठ जागा जिंकल्यानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा बॅंकेत भाजपने ९, राष्ट्रवादी काँग्रेसने ८, तर शिवसेनेने ४ जागा जिंकल्या होत्या. भाजपकडून अध्यक्षपदावर दावा सांगितला जात होता. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही दावा केला जात होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या दगाफटक्याची जाणीव ठेवून या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सावध पावले उचलली होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्षपदाबाबत मकरंद पाटील यांच्याशी सल्लामसलत केले होते. मात्र, भाजपला दूर ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने झेडपीतील नामुष्कीचा वचपा काढला आहे. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यामुळे कऱ्हाडमध्ये उंडाळकर गटाला सत्तेचे टॉनिक मिळाले आहे.
पालकमंंत्री शंभूराज देसाई यांचे साडू ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नावाला शिवसेनेकडून हिरवा कंदिल मिळाला. राष्ट्रवादीकडून अगोदरच उंडाळकर यांचे नाव निश्चित केले होते. जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी उंडाळकर आणि उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांचे नाव निश्चित झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या विरोधात अर्ज भरण्यात आला नाही, त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.