Kolhapur Crime News : माणगावातील अल्पवयीन स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 48 तासांनंतर संशयित आरोपी कर्नाटकात जेरबंद

Swara Upadhye Murder Case : माणगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाच्या तपास वेग लागला असून संशयित आरोपीला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जेरबंद करण्यात आले आहे.
Kolhapur Murder Case
Kolhapur Murder CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रप्रभू मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या 15 वर्षीय स्वरा नितीन उपाध्ये हिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. शनिवारी (17 ऑक्टोबर) रात्री मंदिराशेजारील अरुंद गल्लीत ही घटना घडली होती.

या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण लगम्मावर (वय 37, रा. माणगाव) याला तब्बल 48 तासांनंतर पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अटक केली आहे. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो पोलिसांच्या ताब्यात सापडला असून, त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

माणगावातील हत्येने परिसरात खळबळ

माणगाव येथील स्वरा नितीन उपाध्ये ही इयत्ता नववीत शिकत होती. नवरात्रोत्सवानिमित्त ती दररोज चंद्रप्रभू मंदिरात आरतीसाठी जात असे. शनिवारी रात्रीही ती नेहमीप्रमाणे आरतीसाठी मंदिरात गेली होती. मात्र, आरती आटोपून घरी परतत असताना मंदिराशेजारील अरुंद गल्लीत तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली स्वरा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

Kolhapur Murder Case
Baramati Crime News : बारामती हादरली! बड्या उद्योजकावर प्राणघातक हल्ला, जखमी अवस्थेत पुण्यातील रुग्णालयात दाखल

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलिसांना कळवलं. त्यानंतर स्वराला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे माणगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली.

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट

स्वराच्या मृतदेहाचं रविवारी (18 ऑक्टोबर) सकाळी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

आरोपीच्या शोधासाठी चार पोलीस पथकं तैनात

हत्येनंतर संशयित आरोपी अरुण लगम्मावर पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन पथकं आणि हातकणंगले पोलिसांचं एक पथक अशी एकूण चार पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी कर्नाटकातही तपासाची चक्रं वेगाने फिरवण्यात आली. अखेर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला. सदलगा पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत असून, त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Kolhapur Murder Case
Crime News : 70 ते 80 युवतींना फसवल्याचा दावा; इन्स्टाग्रामवर ओळख, नालासोपारा जिम ट्रेनरला पोलिसांकडून अटक

घटनेनंतर माणगाव बंद; विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची मागणी

या हत्येच्या घटनेनंतर माणगावमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेच्या निषेधार्थ गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांच्या वतीने कँडल मार्च काढून मृत स्वराला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. आता संशयित आरोपीला अटक झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाकडे आणि हत्येमागील नेमकं कारण काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com