

Solapur, 29 August : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज (ता. २९ ऑगस्ट) माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. माढ्यातील नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनानंतर बार्शीमार्गे लातूरकडे जात असताना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणाने मंत्री पाटील यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मंत्र्याची गाडी पुढे जात असल्याचे पाहून त्याने गाडीच्या मागे धावत जाऊन त्यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माढ्यात एकच खळबळ उडाली.
माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्ताने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज माढ्याच्या दौऱ्यावर आले होते. शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते लातूरकडे निघाले होते.
बार्शीमार्गे तुळजापूरहून लातूरकडे जात असताना माढ्याच्या बाहेर आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे बापू गायकवाड यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गाडीचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मंत्र्याची गाडी न थांबता पुढे जात असताना गायकवाड यांनी गाडीच्या मागे धावत जाऊन गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला.
गायकवाड यांनी गळ्यात भगवा पंचा घालून मनोज जरांगे पाटील आगे बढो, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलक बापू गायकवाड यांना तत्काळ गाडीखालून बाहेर काढत बाजूला केले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सहकार मंंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनांचा ताफा लातूरला जाण्यासाठी तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.