Satara Politic's : शंभूराज देसाईंनी अखेर ठेवणीतला डाव टाकला; ZPपासून जिल्हा बॅंकेपर्यंतचा सर्व हिशेब चुकता होणार...

Shambhuraj Desai Vs Jaykumar Gore : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय नाराजीच्या पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. शिंदे-देसाई जोडीच्या रणनीतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
 Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Jaykumar Gore-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 29 August : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर साताऱ्यात झालेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आणि त्यातील त्यांचं ‘कार्यकर्ता जेव्हा अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा होतो, मी स्वभावाला रोखठोक आणि हिशेबाला चोख आहे,’ ही विधानं आठवा. तसेच, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘झेडपी अध्यक्षपदावेळी झालेली जखम फक्त वरून भरली आहे’ असे विधान केले होते. झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या त्या अपमानाचे उट्टे काढण्यासाठीच शिंदे-देसाई जोडीने साताऱ्यात मोठा डाव टाकला आहे. त्यातूनच शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश होत असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकापासून साताऱ्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ल्याचे बुरुज ताब्यात घेण्यासाठी या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. त्यातूनच दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. त्यातून एकमेकांना शह-कटशह देण्याचे राजकारण सुरू आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असूनही दोन्ही पक्षाचे सदस्य फोडून भाजपने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसविला होता. त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना जिल्हा परिषदेच्या आवारात पोलिसांनी धक्काबुक्की केली होती, त्यात देसाई यांच्या हाताला जखम झाली होती.

दोन्ही पक्षाचे सदस्य तर भाजपने फोडलेच होते. मात्र, शिवसेना आमदाराच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन आमदारासोबतच त्यांच्या सदस्यांनाही आपल्या बाजूने भाजपने खेचले होते, त्यामुळे शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले होते. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना तर जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या दारावर येऊनही त्यांना मतदान करण्याआधीच उचलून नेले होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी घडलेल्या घडामोडीमागे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे होते, हे शिवसेना नेत्यापासून लपून राहिले नव्हते. झेडपी अध्यक्षपदावेळी झालेला अपमान शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर गिळला होता. मात्र, त्यानंतरही गोरे यांच्याकडून देसाई यांना डिवचण्याचे प्रकार सुरू होते.

काही दिवसांपूर्वी सोलापुरात बोलताना जयकुमार गोरे यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्हावे, अशी आपली इच्छा आहे. ती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे जाहीरपणे म्हटले होते. तसेच, सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे पुन्हा भाजपसोबत संघर्ष होण्याची शक्यता गृहीत धरून शंभूराज देसाई यांनी ‘झेडपी अध्यक्षपदावेळी झालेल्या जखमा फक्त वरून भरल्या आहेत,’ असे सांगून आपल्या मनातील खंत बोलून दाखवली होती.

 Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Solapur DCC Bank : सोसायटी मतदारसंघातून घेतले बिगर नावाचे (कोरे) ठराव; भाजप नेत्याचीच सहनिबंधकांकडे तक्रार

एकंदरीतच सातारच्या राजकारणात वारंवार येणारी दुय्यमपणाची वागणूक शंभूराज देसाई यांना खटकत होती. ते योग्य वेळीची वाट पाहत असल्याचे दिसून येत होते. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीवेळी शेखर गोरे यांना भाजप नेत्यांकडून दिलेला शब्द पाळला गेला नाही. त्याचवेळी आक्रमक स्वभावाच्या शेखर गोरे यांनी आपल्या मनातील भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवल्या होत्या. आताही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा कोंडी होण्याची लक्षणे दिसताच शेखर गोरे यांनी आपली स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

शिवसेना आणि शंभूराज देसाई हे तर संधीचे वाटच पाहत होते. त्यांनी शेखर गोरेंना पक्षात घेण्याचा निर्णय घेत जयकुमार गोरे यांना घरातच चेकमेट देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने अगोदरच धनुष्यबाण हाती घेतली. आता आगामी काळात माण खटावमध्येही शेखर गोरे यांच्या माध्यमातून शिवसेना मजबूत करण्याचा डाव देसाई यांनी टाकला आहे. त्याला जयकुमार गोरे कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

शेखर गोरे यांची ताकद

मागील विधान परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांची दमछाक केली होती. तसेच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळी विरोधात असूनही सोसायटी मतदारसंघातून विजय मिळविला होता. आताही सोसायटी गटात शेखर गोरे यांची दावेदारी मजबूत समजली जाते. त्यांची पत्नी भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे शेखर गोरे यांची राजकीय ताकद दुर्लक्षून चालणारी नाही.

 Jaykumar Gore-Shambhuraj Desai
Mohite Patil Vs Autade : मोहिते पाटील-आवताडे लढत झालेल्या ‘कृषी प्रक्रिया-पणन’मध्ये पुन्हा ‘हाय व्होल्टेज’ फाईट

जयकुमार गोरे कोणत्या मतदारसंघातून लढणार?

दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बॅंकेत एन्ट्री करायची आहे, त्यासाठी त्यांनी पुरेपूर तयारी केली आहे, पण ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात आणि निवडून येतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Eknath shinde, shmbhuraj desai, jaykumar gore
Makarand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale-Jaykumar Gore
Shekhar Gore
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com