Mayani ZP Election 2025 : जिल्हा परिषद मायणी गटासाठी इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होताच सत्ताधारी गुदगे गटाला आनंदाचे भरते आले आहे, तर अनपेक्षित आरक्षण पडल्याने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढे तगडा उमेदवार देण्याचे महासंकट उभे ठाकले आहे.
सुरेंद्र गुदगेंना रोखण्यासाठी विरोधकांची धावाधाव सुरू झाली असल्याचे चित्र आहे. यात विरोधकांचा उमेदवाराचा शोध माजी सरपंच सचिन गुदगे किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी नीता गुदगे यांच्यापर्यंत येऊन संपण्याची शक्यता आहे.
मायणी गटात खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, इतर मागास प्रवर्गासाठी गट आरक्षित झाला. त्यामुळे खुल्या गटातील अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले. त्याउलट राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसाठी आकाश ठेंगणे झाले आहे.
त्यातूनच काही उत्साही कार्यकर्त्यांनी ‘आता गुलाल आपलाच’ अशा पोस्ट समाजमाध्यमावर शेअर करून विरोधकांना डिवचले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांत गुदगे गटाने विरोधकांना फाटीही शिवू दिलेली नाही. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत मायणी गटात गुदगे घराण्याचीच सत्ता राहिली आहे.
त्यामध्ये सुरेंद्र गुदगे दोन वेळा तर त्यांच्या सुविद्य पत्नी शोभना गुदगे यांनी एकदा विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. सत्ता असो वा नसो विकासकामे कशी करायची, त्यासाठी निधी कसा आणि कोणाकडून मिळवायचा, या बाबतीत तयारी ठेवणाऱ्या सुरेंद्र गुदगेंनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करून विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.
अनेक प्रयत्न करूनही सत्ता मिळत नसल्याने विरोधकांतील आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. परिणामी, गुदगेंच्या विरोधात सहजासहजी कोणी दंड थोपटत नाहीत. आताही तशीच स्थिती दिसते आहे. ओबीसी प्रवर्गातील तुल्यबळ उमेदवाराचा शोध विरोधक घेत आहेत. त्यासाठी चाचपणी सुरू आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण शड्डू ठोकून, जोर-बैठका काढू लागले आहेत; पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरून बलाढ्य उमेदवार असलेल्या सुरेंद्र गुदगेंचा कसा सामना करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर त्यासाठी सक्रिय झाले असून, प्रमुख कार्यकर्ते, इच्छुकांच्या भेटीगाठी घेण्यासह राजकीय चर्चांना वेग आला आहे. तुल्यबळ ओबीसी उमेदवार मिळतोय का? कोणी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढले आहे का? असेल तर त्याची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे का? अशा दृष्टीने धावाधाव करण्यात येत आहे. त्यासाठी राजकीय डावपेच टाकले जात आहेत. अशा स्थितीत मंत्री गोरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. सूरज पाटील, पांडुरंग झगडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
अखेरच्या टप्प्यात कदाचित सुरेंद्र गुदगेंच्या विरोधात त्यांचे कनिष्ठ बंधू, माजी सरपंच सचिन गुदगे किंवा त्यांच्या सुविद्य पत्नी नीता गुदगे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून डॉ. उदय माळी, ॲड. तुकाराम माळी आणि ॲड. रोहित पाटोळे यांची नावे पुढे येत आहेत. अजिंक्य उद्योग समूहाचे अध्यक्ष हिम्मतराव देशमुख यांनी जिंकू किंवा हरू, निवडणूक लढणारच, असा निर्धार केला होता. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.