

Satara News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका महिलेचा मुद्दा चांगलाच जागला होता. ज्यामुळे त्यांच्यावर अधिवेशनात टीका झाली होती. यावरून त्यांनी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्यावर हक्कभंग आणला होता. तर ज्या महिलेनं तक्रार केल्याचे म्हटलं जात होत तीच खंडणीच्या आरोपाखाली आता पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणानंतर आता त्यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान देत बारामतीच्या समोर झुकणार नसल्याचे संकेत दिलेत. एकीकडे या कारणांनी राजकीय वर्तुळात जयकुमार गोरे चर्चेत असतानाच आता ते त्याच्या मुलामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे ते सध्या राज्याच्या राजकारण चर्चेत आले आहेत. त्यांनी, आपण मंत्री झाल्याचे शरद पवारांना अद्याप पचलेले नाही. माझं राजकारण संपलं तरी चालेल, मी बारामती अन् पवारांच्या पुढे कधीही झुकणार नसल्याचे म्हटलं होतं. या वक्तव्यावरून सध्या राज्यभर चर्चा रंगली होती. अशातच आता त्यांच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. ज्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज याने सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करत स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण केला आहे. याबाबच आदित्यराज याच्या स्टंटचे काही फोटो आणि व्हिडिओ भैया पाटील यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत. तसेच यावरून राज्य सरकार आणि मंत्री जयकुमार गोरे यांना सवाल केला आहे. भैया पाटील यांनी केलेले या पोस्टमुळे आता टीकेची झोड उठली असून सर्वसामान्य असता तर भला मोठा दंड आणि कारावासाची शिक्षा झाली असती, असे बोलले जात आहे. दरम्यान आता आदित्यराज गोरे यांने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ डिलीट केला आहे.
आदित्यराज्य याने, लाईव्ह स्टंट करत स्वतःच्या सोशल मीडियावर टाकले आहेत. अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात असल्याचा आरोप भैया पाटील यांनी केला आहे. तर या बाईकला नंबर प्लेटसुद्धा नसून कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
तसेच जर हेच कृत्य सर्व सामान्य व्यक्तीने केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली गेली असती, असेही भैया पाटील यांनी म्हटलं आहे. तर याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. राऊत यांनी, मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत का? जे साताऱ्यात सुरू आहे. ते आधी काय आहे याकडे आधी पाहावे, असे राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे राज्य सरकार कसे पाहतं? यावरून जयकुमार गोरे कोणते स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.