बिजवडी : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांच्या हेतू पुरस्कर रखडविलेल्या निविदा त्वरित काढाव्यात या मागणीचे पत्र आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर तात्काळ आदेश निघून या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
मागील सरकारच्या कार्यकाळात रखडलेली या योजनेची कामे आता मार्गी लागणार असल्याने माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उरमोडीचे खरीप आवर्तन सोडण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याने खटाव, माणमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
याबाबतची माहिती देताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे ६७ गावांमधील २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून सतत प्रयत्न करुन या योजनेच्या कामांना मी लागेल तितका निधी उपलब्ध करुन घेतला. वाढीव खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवली.
सध्या या योजनेची बॅरेज, पंपगृह, बोगदे, विद्युत आणि यांत्रिकी कामे पूर्ण होवून एका नलिकेद्वारे पाणी खटावमधील नेर तलावात सोडण्यात येत आहे. हे पाणी पुढे आंधळी धरणात आणि नंतर माण नदीत सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी दुसरी नलिका, आंधळी उपसा सिंचन आणि वितरण व्यवस्थेची कामे त्वरीत होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या कामांच्या निविदा न निघाल्याने योजना पूर्ण झाली नाही.
रखडलेल्या कामांच्या निविदा काढाव्यात यासाठी मी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, जुन्या कामांच्या निविदा स्थगित करण्यात आल्या. या योजनेची कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी उर्वरित सर्व कामांच्या निविदा तात्काळ काढाव्यात या मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभागाला आदेश दिले आणि या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. आता जिहे कठापूर योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण होवून खटाव, माण आणि माण तालुक्याच्या उत्तर भागाला पाणी देण्याचा मी दिलेला शब्द पूर्ण होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.