
Solapur, 29 April : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांची श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आदिनाथ साखर कारखाना हा गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे आणि आमदार पाटील हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे कारखान्यासाठी सरकारची मदत किती मिळणार, हा खरा प्रश्न आहे. पवारांच्या आमदाराकडे बंद असलेल्या ‘आदिनाथ’च्या अध्यक्षपदाची आलेली जबाबदारी म्हणजे एक प्रकारे ओसाड गावच्या पाटीलकीसारखेच आहे. मात्र, निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आदिनाथ कारखाना चालू करण्याचे मोठे चॅलेंज आमदार पाटील यांच्यापुढे असणार आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath Sugar Factory) निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला होता. संजय शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांची, तर उपाध्यक्षपदी केम ऊस उत्पादक गटातून विजयी झालेले महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पाटील यांची निवड ही एक वर्षाकरिता असणार आहे. म्हणजे पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष कारखान्याला मिळणार आहेत.
अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकारी निवडीबाबतची बैठक झाली होती, त्यानुसार अध्यक्षपदी नारायण पाटील, तर उपाध्यक्षपदी महेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तो सुरू करून दाखवण्याचे मोठे चॅलेंज नारायण पाटील आणि संचालक मंडळासमोर असणार आहे. मुळात नारायण पाटील हे विरोधी पक्षातील म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत.
सत्ताधारी बाजूकडे 232 पेक्षा जास्त आमदार आहेत, त्या सर्व आमदारांनाच निधी देताना किंवा खूष ठेवताना सरकरी पक्षांची तारांबळ उडताना दिसू येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदार असलेल्या नारायण पाटील यांना सहजासहजी राज्य सरकार मदत करेल, असे वाटत नाही. कारण सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा गेल्या काही वर्षांतील व्यवहार पाहता, हे तंतोतंत खरे ठरण्याची शक्यता अधिक आहे.
सरकार किती गंभीर?
आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कारखाना सुरू करण्यासाठी भेटणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, सरकारने कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र, सरकार याचा गांभीर्याने विचार करणार का, हाच खरा प्रश्न आहे.
नेतेमंडळींची साथ लाभणार का?
आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ने आदिनाथ कारखाना चालविण्यासाठी घेतला हेाता. मात्र, त्यावेळी नारायण पाटील यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे नारायण पाटील यांना आदिनाथ कारखान्यासाठी नेतेमंडळींची किती साथ मिळते, यावर ‘आदिनाथ’चा बॉयलर पेटण्याचे भवितव्य अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.