Raju Khare : ‘मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली’ म्हणणाऱ्या आमदार राजू खरेंची राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनालाही दांडी!

NCP SharadChandra Pawar's party Anniversary : पवारांनी सिद्धी कदम हिचे तिकिट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडून येताच अवघ्या काही दिवसांत खरेंनी पक्षाला झटके देण्यास सुरुवात केली होती.
Raju Khare
Raju KhareSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर मोहोळ मतदारसंघातून अवघ्या 15 दिवसांत आमदार झालेले राजू खरे यांनी आज पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनाला दांडी मारली. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी ज्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून माजी आमदार सिद्धी कदम यांच्या मुलीचे तिकिट कापून खरे यांचे तिकिट आणले, तेच खरे निवडून आल्यापासूनच ‘मी नावालाच तुतारीवाला,’ असे सांगत फिरत आहेत, त्यामुळे मोहोळमधील महाआघाडीतील नेत्यांवर डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (NCP SP) 26 वा वर्धापनदिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांपासून खासदार नीलेश लंके यांच्यापर्यंत सर्वांनी व्यासपीठ गाजविले. राज्यभरातील आमदार, खासदार, नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यात आले होते. मोठ्या दिमाखात वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापदिन कार्यक्रमास सोलापूरमधील आमदार नारायण पाटील, उत्तमराव जानकर, अभिजीत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. मात्र, मोहोळचे पक्षाचे आमदार राजू खरे (Raju Khare) मात्र वर्धापनदिन कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली.

आमदार राजू खरे हे वर्धापनदिन कार्यक्रमाला गैरहजर होते, याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यानेही ते कार्यक्रमाला दिसले नाहीत, असे सांगून दुजोरा दिला. याबाबत आमदार खरे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित राहण्याचे कारण समजू शकले नाही.

राजू खरे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत ते शिवसेनेसोबत होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार यशवंत माने यांना तिकीट दिल्याने खरे यांना दुसरा पर्याय शोधावा लागला. त्याचदरम्यान, शरद पवारांच्या पक्षाकडून माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकिट जाहीर झाले होते.

सिद्धी कदम हिला जाहीर झालेले तिकीट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बारामतीत जाऊन पवारांपुढे आग्रह धरला. त्यानंतर पवारांनी सिद्धी कदम हिचे तिकिट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडून येताच अवघ्या काही दिवसांत खरेंनी पक्षाला झटके देण्यास सुरुवात केली होती.

निवडून आल्यानंतर पंढरपूरमधील सत्कार समारंभात राजू खरे यांनी ‘हा तुतारीवाला नुसता नावालाच आहे. राज्यातील सत्ता सुद्धा आपली आहे, ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणे येणार आहे, असे विधान केले होते. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खरे यांनी ‘मला चुकून तुतारी घ्यावी लागली, मी तीस वर्षे तुमच्या सोबत होते,’ असे गोरेंना उद्देशून म्हटले होते, त्याचवेळी धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘समोर पत्रकार आहेत’, अशी आठवणही करून दिली होती, मात्र खरे यांनी त्यालाही न जुमानता आपल्या विधानावर ठाम राहत ‘समोर पत्रकार असले तर असू द्या’ असे सर्वांसमोर म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातील मेळाव्यालाही खरे यांनी दांडी मारली होती. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या सांगोल्यातील कार्यक्रमाला खरे यांनी हजेरी लावली होती. दुसरीकडे, अक्कलकोट येथे नुकतेच झालेल्या माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशाच्या वेळी खरे हे एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे खरे हे कागदोपत्रीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहिले आहेत, मात्र, ते एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेल्याचे स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com