Solapur, 30 June : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राम सातपुते हे तब्बल २५ दिवसांनंतर सोलापुरात येत आहेत. निकालानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांवर झालेल्या खळबळजनक आरोपांना सातपुते काय उत्तर देणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. तसेच, सोलापुरातील पुढील राजकीय वाटचालीबाबत सातपुते काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या उपस्थितीत सोलापूर (Solapur) शहरात आज (ता. ३० जून) सायंकाळी पाचच्या सुमारास भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा ऋणानुबंध मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याला भाजपचे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोणते नेते उपस्थिती लावणार, याची उत्सुकता असणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यामध्ये तुल्यबळ लढाई झाली. या लढाईत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा तब्बल 74 हजार मतांनी पराभव केला. या पराभवानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्लाबोल सुरू ठेवला आहे.
दक्षिण सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदे यांनी ‘देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळींनी लोकसभा मतदानाच्या दोन दिवस अगोदर सोलापुरात दंगली घडविण्याचा कट रचला होता,’ असा खळबळजनक आरोप केला होता, त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्येही संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडूनही राम सातपुते यांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे सातपुते हे काँग्रेस नेते आणि प्रणिती शिंदे यांचा कोणत्या शब्दांत समाचार घेतात का, हेही पाहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना सहा लाख वीस हजार, तर राम सातपुते यांना पाच लाख 46 हजार मते मिळाली आहेत. जवळपास साडेपाच लाख मते मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सातपुते हे लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल 25 दिवसांनंतर प्रथमच सोलापुरात येत आहेत. या ऋणानुबंधाच्या मेळाव्यात राम सातपुते हे कोणाला लक्ष्य करतात आणि कोणावर बाण सोडतात, याची उत्सुकता असणार आहे.
स्वकीयांबाबत काय भूमिका?
सोलापूर लोकसभा निवडणुकीत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा सोलापूर शहर उत्तर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे दोघेच सातपुते यांना मताधिक्य देऊ शकले. मात्र, दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने हे सातपुते यांना लीड देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांबाबत त्यांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.