

सांगली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आणि एक कॅबिनेट मंत्री असल्याने स्वबळावर लढण्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे जाहीर केले आहे.
महायुती एकत्र येणार की भाजप पुन्हा स्वबळाची ताकद आजमावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sangli Zilla Parishad elections News: बलराज पवार
भाजपने सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सांगली, मिरज, जत आणि शिराळा या चार मतदार संघात विजय मिळवला. या चार आमदारांच्या ताकदीने भाजप जिल्हा परिषदेत स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवणार का हा प्रश्न आहे. २०१७ मध्येही भाजपचे चार आमदार असताना जिल्हा परिषदेत त्यांना २७ जागा मिळाल्या होत्या. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले असून अद्याप महायुती एकत्र येणार का याची चर्चा नाही. त्यामुळे भाजप एक कॅबिनेट मंत्री आणि चार आमदारांच्या ताकदीने भाजप जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर दंड थोपटणार का? महायुती एकत्र येणार, की पुन्हा एकदा स्वबळाची ताकद आजमावणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप समोर आव्हान उभे करीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येऊन २१ जागा जिंकल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा परिषद एकत्र लढणार असल्याचे सध्यातरी ठरवले आहे. मात्र महायुती एकत्र येणार, की पुन्हा एकदा स्वबळाची ताकद आजमावणार याकडे लक्ष आहे. महापालिका निवडणूक भाजपने स्वतंत्र लढवून ७८ पैकी ३९ जागा जिंकल्या. आता भाजप नेते जिल्हा परिषद निवडणुकीत घटक पक्षांनासोबत घेण्याचा प्रयत्न करणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा स्वतंत्र लढून सत्तेसाठी भाजपसोबत बार्गेनिंग करण्याची ताकद तयार करणार याची उत्सुकता आहे.
अलीकडेच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत जत आणि आटपाडी वगळता भाजपला यश मिळाले नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूर, आष्टा या दोन नगरपालिकेत आपली ताकद दाखवून दिली. तर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पलूस नगरपालिका जिंकली. शिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आमदार सुहास बाबर यांनी विटा नगरपालिका जिंकली आहे. तर माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिकेत सत्ता मिळवून पुन्हा आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत आणि आटपाडीत विजय मिळवले आहेत.
हा विजय त्या त्या आमदारांचा उत्साह वाढवणार असल्यामुळे ते जिल्हा परिषद निवडणुकीतही स्वतःची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सांगली, मिरज, जत आणि शिराळा या चार मतदार संघात विजय मिळवला. या चार आमदारांसह पालकमंत्र्यांच्या ताकदीने भाजप जिल्हा परिषदेत स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवणार का हा प्रश्न आहे. २०१७ मध्येही भाजपचे चार आमदार असताना जिल्हा परिषदेत त्यांना २७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्तेसाठी त्यांना शिवसेना, अजितराव घोरपडे गट आदी घटक पक्षांची सोबत घ्यावी लागली होती.
महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेत एकत्रित येऊन २१ जागा जिंकल्या. यात शरद पवार गटाला जागा कमी मिळाल्या असल्या तरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जयंत पाटील वाळवा तालुक्यात पक्षाची ताकद दाखवू शकतात. याशिवाय जत तालुक्यात विलासराव जगताप आणि विक्रम सावंत या माजी आमदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर हे खानापूर आटपाडी तालुक्यात भाजपला टक्कर देऊ शकतात.
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू असल्या तरी दुसरीकडे भाजपचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरपालिका आणि आटपाडी नगर पंचायतमध्ये भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचे तयारी करू शकतात. खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजपमध्ये आलेले वैभव पाटील यांची त्यांना साथ लाभेल. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे आव्हान असेल.
पलूस, कडेगावला भाजपने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद लाड यांना आपल्यात घेतले आहे. मात्र भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख यांच्यातील दुही या मतदारसंघात भाजपला अडचणीत आणू शकते. त्यामुळे या दोन तालुक्यातील आठ जागांमध्ये भाजप कशी तडजोड करणार हे पाहावे लागेल.
शिराळ्यात मानसिंग नाईक आणि शिवाजीराव नाईक हे दोन्ही माजी आमदार एकत्र येऊन भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्यासमोर आव्हान उभे करणार का याची उत्सुकता आहे. दोन्ही नाईक शिराळा शहराबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातही ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. ती किती ते जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल.
गेल्या निवडणुकीत भाजपला वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुका वगळता सर्व तालुक्यात यश मिळाले होते. आटपाडी, जत, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपचा यंदाच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. २०१७ चे
पक्षीय बलाबल
भाजप २७
शिवसेना ३
रयत विकास आघाडी ४
स्वाभिमानी विकास आघाडी २
शेतकरी संघटना १
काँग्रेस ९
राष्ट्रवादी काँग्रेस १४
1) सांगली जिल्ह्यात भाजपला किती आमदार आहेत?
भाजपचे सांगली, मिरज, जत आणि शिराळा असे चार आमदार आहेत.
2) भाजप यापूर्वी जिल्हा परिषदेत किती जागा जिंकल्या होत्या?
२०१७ मध्ये भाजपला जिल्हा परिषदेत २७ जागा मिळाल्या होत्या.
3) महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?
महाविकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याचे जाहीर केले आहे.
4) महायुतीबाबत सध्या काय स्थिती आहे?
महायुती एकत्र लढणार का याबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही.
5) भाजपसमोर मुख्य प्रश्न कोणता आहे?
स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक लढायची की महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घ्यायचा, हा मुख्य प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.