Nagar Political News: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील काही ठराविक समाजातील लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. अल्पवयीन मुलांना हाताशी धरून महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करायला लावले जात आहे.
सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करण्यास भाग पाडले जात आहे, असे गंभीर आरोप ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संभाजी कदम आणि विक्रम राठोड यांनी केले आहे. धक्कादायक म्हणजे, विशिष्ट समाजाला हाताशी धरुन काही नेते मंडळीच हे उद्योग करत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे.
नगर शहरात जाणीवपूर्वक महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत नगरमध्ये झालेल्या हत्या, औरंगजेबाचा फोटो मिरवणुकीत नाचवणे, स्टेट्स ठेवणे आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या घटना घडल्या. यातून दोन समाजात तणाव वाढला, या सर्व घटनांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली.
याबाबत आज शिवसेनेने मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह आदी उपस्थित होते.
शनिवारी रात्री मुकुंदनगरमधील एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून सोशल मिडियावर ऑडिओ क्लिप तयार करुन व्हायरल केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अरमान नईम शेख (रा. मुकुंदनगर) याला अटक करण्यात आली. या मुद्यावर रविवारी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आ.संग्राम जगताप यांनी आंदोलन करत अशा घटनांमागील सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे.
मुस्लिम सामाजिक संघटनांनी देखील अशा घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात असल्याचा आरोप केला आहे. या घटनांमागे षडयंत्र रचले जात असून पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.