

kolhapur News : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांची राष्ट्रवादीसोबत मनोमिलन करायचे की भाजपसोबत युती करायची अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपचे नेते आणि चंदगडचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील, दुसरीकडे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांनी देखील बाभुळकर यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. येत्या दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाभुळकर यांनी माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर आणि मुलगी डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारीची माळ माजी आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत लढत असताना चंदगडमधून राजेश पाटील यांचा विजय झाला. गेल्या काही वर्षांमधून चंदगडमध्ये राष्ट्रवादी टिकवण्यासाठी पाटील यांची धडपड राहिली. मात्र अंतर्गत मतभेदामुळे कुपेकर आणि पाटील यांच्यात खास करून राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर कुपेकर गटाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 च्या निवडणुकीत सध्याचे आमदार शिवाजीराव पाटील हे देखील अपक्ष रिंगणात राहिले होते. तर संग्रामसिंह कुपेकर शिवसेनेकडून, वंचितकडून अप्पी पाटील हे देखील रणांगणात होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून तर डॉ. नंदाताई बाभुळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात उतरल्या. तर अपक्ष म्हणून शिवाजीराव पाटील त्यांनी निवडणूक लढवली. यामध्ये अपक्ष शिवाजीराव पाटील यांचा विजय झाला.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चंदगडकरांनी नेहमीच पक्षापेक्षा गटाला महत्व दिले आहे. आमदार शिवाजीराव पाटील माजी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत संग्रामसिंह कुपेकर, आप्पी पाटील, नंदाताई बाभुळकर आणि कुपेकर गट, यांची व्यक्तिगत ताकद लक्षणीय आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांनी काही दिवसापूर्वी डॉ. नंदाताई बाभुळकर यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात युती करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. याचबरोबर राजेश पाटील यांनी देखील कुपेकर यांची भेट घेतली आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांनी आप्पी पाटील, जनसुराज्यचे मानसिंगराव खोराटे यांना देखील सोबत घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत.
भाजपमध्ये असलेले संग्रामसिंह कुपेकर हे देखील आगामी निवडणुकीच्या तोंडावर धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आमदार शिवाजीराव पाटील आणि कुपेकर यांचे वैचारिक मतभेद आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळणे कुपेकरांना अपेक्षित आहे. शिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली आहे. शिवाय युती कोणासोबत करावी यासाठी डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी नुकतीच यासंदर्भात माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. स्थानिक पातळीवर युती कोणासोबत करावी यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे.
30 ऑक्टोंबर रोजी त्यांनी चंदगडमध्ये काही मोजक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मत हे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत जाण्याचे आहे. तर गडहिंग्लजमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत हे राजेश पाटील यांच्यासोबत जाण्याचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतरच डॉ. बाभुळकर या निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन दिवसात या सर्व घडामोडीवर निर्णय होणे शक्य आहे. मात्र आमदार पाटील यांच्यासोबत भाजपसोबत युती करायची की माजी आमदार पाटील यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादीसोबत जाऊन मनोमिलन करायचे? या द्विधा अवस्थेत डॉ. बाभुळकर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.