

Nashik Election News: शिवसेना आणि मनसे यांची पहिली संयुक्त सभा शुक्रवारी(ता.9) नाशिकला झाली. राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या सभेमुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीला मोठा हातभार लागला. शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा झाली. ठाकरे बंधूंच्या नाशिकमधील या सभेला मोठी गर्दी झाली होती.
महापालिका निवडणुकीतील राज्यातील पहिली संयुक्त सभा नाशिकला झाली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले. दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेल्या आक्रमक भाषणांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणाचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी घोषणा देणाऱ्यांना थांबवले. जेव्हा मी सांगेन तेव्हा घोषणा द्या. त्यानंतर त्यांनी तडाखेबंद भाषणाला सुरुवात केली.
भाजप आणि त्यांनी भ्रष्ट व वादग्रस्त माजी नगरसेवकांना दिलेला प्रवेश आणि नाशिक शहराला निर्माण केलेली बकाल अवस्था हा त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा होता. 1952 मध्ये स्थापन झालेल्या भाजपला आजही दुसऱ्यांची पोर कडेवर घ्यावी लागतात, या शब्दात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला टोमणा मारला.
लाडकी बहीण या योजनेतून समाज आणि शहर व राज्याला उध्वस्त करण्याचे काम भाजप करीत आहे. घरोघरी पैसे वाटून मते विकत घेत आहे. हे पैसे किती दिवस पुरणार आहेत. हे पैसे भाजपने आणलेत कुठून? याचा विचार प्रत्येक भगिनीने केला पाहिजे. कारण भाजप आपल्या कारभारातून आपल्या पुढच्या पिढ्यांची, लहान मुलांची आणि शहरांची भवितव्य नष्ट करीत आहे.
त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिला वर घेतले. फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते, त्याचे काय झाले? नाशिक शहरात मेट्रो प्रकल्प येणार होता. अशा अनेक घोषणांचा उल्लेख त्यांनी केला. त्या प्रत्येक घोषणेनंतर उपस्थितांमधून नाही, नाही असे उत्तर येत होते.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना नाशिककरांना आम्हाला संधी द्या, या शहराचे आणि तुमचे भवितव्य घडवून दाखवू. हे सर्व आम्ही सांगत आहोत. अन्यथा पुन्हा भाजपच्या थापांना भुललात तर हे शहर आणि नागरिकांचे भवितव्य संकटात गेल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले
उद्धव ठाकरे म्हणाले , आज ममता बॅनर्जींसह संपूर्ण बंगाल हुकूमशाही विरोधात रस्त्यावर रस्त्यावर उतरला आहे. मग आपण शेपूट घालून बसणार. हा वचननामा आहे. हा छापलेला रंगीत कागद नाही. हा ठाकरेंचा शब्द आहे. ही बोगस मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचं श्रेय घेत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षातील ही चौथी सभा आहे. आजच्या सभेत मला आनंद होतोय. माझ्यासोबत माझा भाऊ आणि मनसेचा अध्यक्ष राज आहे. संजयही सोबत आहे. उद्याच्या महापालिकेतील नगरसेवक आहे. ही सर्व जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहतेय. त्यांच्या व्यथा संजय आणि राजने मांडल्या. राजने तर त्यांच्याकडे महापालिका असताना काय कामे केली हे अभिमानाने सांगितलं. नाशिक आणि मुंबईत शिवसेनेने कामं केली. काम करणारे दोन भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल याचा तुम्ही विचार करा,असंही ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
यावेळी खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, प्रथमेश गीते, मनसेचे सुदाम कोंबडे, सलीम शेख, डॉ प्रदीप पवार यांचं विविध प्रमुख नेते आणि उमेदवार व्यासपीठावर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.