नगर : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) आणि राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासह भाजपचे अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी रेल्वेस्थानकाबाहेरच्या गजानन वडापाव सेंटरमध्ये नाश्ता केला होता. या सगळ्यांनी तब्बल दोनशे वडापाव आणि काही प्लेट भज्यांवर ताव मारला. मात्र, नाश्त्याचे पैसे कुणीच दिली नव्हते. या प्रकरणाची राज्यभर चांगलीच चर्चा झाली. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दानवे यांच्यावर निशाणा साधला.
या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली...एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने '३५' मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाले. आणि हो... मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केले.'' असा टोला रोहित पवार यांनी लगावला. (Rohit Pawar criticizes Raosaheb Danve)
मध्य रेल्वे विभागाच्या वतीने ठाणे-दिवा लोकलमार्गाच्या सहाव्या मार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन पार पडले. त्यानंतर अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक आमदार खासदारांनी ठाणे स्टेशन बाहेरील गजानन वडापास सेंटर गाठले. भुकेची वेळ असल्याने सगळ्यांनी तब्बल दोनशे वडापाव आणि काही प्लेट भज्यांवर ताव मारला. आता केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार असा लवाजमा, त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी असल्याने मोठी गर्दी होती. त्यामुळे नाश्ता झाल्यानंतर सगळा लोंढा हॅाटेलच्या बाहेर पडला, तसे सगळेच निघून गेले. यात हॅाटेलवाल्याला नाश्त्याचे पैसे कुणीच दिले नाही.
त्यामुळे हॅाटेलमधील एका नोकराने याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल केला. तशी राज्यभरात या फुकटात खाल्लेल्या वडापाव, भज्याची चर्चा सुरू झाली. समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांमध्ये देखील याची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर याची कुणकुण या वडापाव पार्टीच्या एका लाभार्थ्यांला लागली. प्रकरण अधिक वाढू नये याची खबरदारी घेत मग त्या पदाधिकाऱ्याने हॅाटेल गाठत सगळे बील चुकते केले. याची वाच्यता करू नका, अशी विनंतीही केली. खाल्लेल्या वडापावचे बील चुकते केले असले तरी याची चर्चा काही केल्या थांबतांना दिसत नाही. त्यावरुन आता रोहित पवार यांनी ट्वीट करत निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.