Shashikant Shinde News : "माझी अवस्था शोलेतील असरानीसारखी असली, तरी आपण शोलेतील गब्बर सिंग जसा गावाला वेठीस धरून लुटत होता, तशाच पद्धतीने तुम्ही आज कोरेगाव मतदारसंघाला लुटत आहात आणि आव मात्र साधुसंताचा आणत आहात. 'जिहे-कटापूर'च्या बाबत एकदा लोकांसमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. आपण आव्हान स्वीकारणार का आणि बैठक लावणार का? त्याचीच मी वाट बघतोय", अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना आव्हान दिले आहे.
आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महेश शिंदे आपण फक्त अडीच वर्षांच्या राजकारणाचा उल्लेख केला. या काळात आपण कुठली जलसंधारणाची, कुठली इरिगेशनची कामे केली? आपण ज्या-ज्या लोकांना आश्वासने दिली, त्या भाडळे खोऱ्यामध्ये, पुसेगावच्या वरच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, जायगाव या भागामध्ये आपण नक्की काय करून दाखवलं, यांचा खुलासा एकदा जनतेसमोर होणे गरजेचे आहे.
कोरेगावमधल्या दुष्काळी भाडळे खोऱ्यामध्ये जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे गावागावांमध्ये केली. पाणी अडवल्यामुळे तेथील टँकर बंद झाला. कदाचित ते तुम्हाला माहीत नसेल. तसेच खटाव भागातील वरील गावांमध्ये पाणी देण्यासंदर्भातला ठराव पहिला मी केलेला आहे. त्याचबरोबर रामोशीवाडी, शेल्टी खिरखिंडीचा ठराव सुध्दा मी मंत्री असतानाच केलेला आहे. ते तुम्हाला बघवत नाही, पाणी अडवण्याचा प्रयत्न करून त्या लोकांना त्रास देता आणि आव मात्र साधु संताचा आणता. भ्रष्टाचार केला म्हणून आमच्यावर आरोप करताय. तुमचं काय चाललंय? असा सवालही शशिकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच १५-२० टक्क्यांनी तुम्ही कामं घेताय, सामान्य, स्थानिक कंत्राटदाराला बाजूला ठेवून स्वतःचे कंत्राटदार पोसताय. अगदी कोरेगाव नगरपंचायत, मेडिकल कॉलेज पासून सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्यावर आरोप होतच आहेत. कशा पध्दतीने दमबाजीने पैसे वसूल करताय, याची चर्चा खमंगपणाने कोरेगाव मतदारसंघात सुरू आहे.
जो तुम्ही टेंडरचा उल्लेख केला, ते टेंडर भरण्यासाठी काही कंत्राटदारांनी अर्ज केलेला असताना त्यांना जो टॅग लागतो, तो मिळू नये म्हणून तुम्ही तुमची माणसं बसवली होती. हे कशासाठी, ठेकेदारीसाठी आणि तुमचं घर भरण्यासाठीच केले होते ना? आणि माझ्यावर आरोप करताना 'रस्ते बघा' असे सांगता, आता काय अवस्था आहे असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे यावेळी म्हणाले.
मग दूध का दूध पाणी का पाणी ते कळेल...
आपण करायचं, दुसऱ्यावर ढकलायचं, हे पाप जास्त दिवस चालत नाही. ही तुमची चाललेली थेरं जनतेच्या लक्षात आली आहेत. पैसे तुम्ही गोळा करताय, तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि आमच्यावर आरोप करताय? माझं कुटुंब त्याच्यावर चालत नाही. मी राजकारण माझ्या पद्धतीने केलेलं आहे. तुमच्यासारखे दोन नंबरचे धंदे करून मी पैसे कमावले नाहीत. एकदा लोकांसमोर सोक्षमोक्ष होऊ द्या आणि मग खरं काय, दूध का दूध पाणी का पाणी ते कळेल असं आव्हानही शशिकांत शिंदेनी आमदार महेश शिदेंना दिले. (Latest Maharashtra News)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.