
Solapur, 24 February : माढ्यात तब्बल 15 वर्षांनंतर आमसभा झाला. त्या आमसभेत गेली पंधरा वर्षांपासून साचलेले सर्व उफाळून आले. त्यात रस्त्याच्या मुद्यावरून एक महिलेने तहसीलदारांना धारेवर धरले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप केले. पुढाऱ्यांनी सांगितलेले एकही काम तहसीलदार करत नाहीत, त्यांच्या एजंटाकडून आलेली कामेच करतात, असा दावा कोकाटे यांनी केला आहे.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच माढ्याची आमसभा झाली. त्या आमसभेत एका महिलेने रस्ता मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. त्यावर आमदार पाटील यांनी तहसीलदारांना मोजणी अधिकाऱ्याला पत्र देऊन संबंधित महिलेला तीन दिवसांत रस्ता मोजून द्यायला सांगितले. त्यावर बराच वेळ खल झाला.
त्याचवेळी संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी माढ्याच्या तहसीलदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ते म्हणाले, पुढाऱ्यानी फोन केला की ते काम करायचं नाही, असा तहसीलदारांचा सर्वसामान्यांमध्ये मेसेज आहे. बेंबळ्यातील एका माणसाचे लॉक ओपन करायचे होते. पहिल्यादा २५ हजार रुपये द्यायचे ठरले होते. पण पुन्हा दीड लाखाची मागणी झाली. तो म्हणाला, तहसीलदार साहेब असा माणूस आहेत, तुम्ही काहीही बोल्ला तर ते सहनच करणार. पण, त्यांना जे करायचे तेच करणार. तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे, कुठल्याही पुढाऱ्यांनी काम सांगितलं की ते करायचं नाही. त्यांच्या हस्तकाच्या मार्फत काम आलं की, ते करायचं. असं त्या माणसाने सांगितलं.
बेंबळ्यांचा त्यांचा एक एजंट आहे. त्या एजंटाला मी बोलावून घेतलं. त्या एजंटला बोलावल्यानंतर त्याने तहसीलदारांना त्या कामाच्या संदर्भात सांगितलं. त्यांनी मला एके दिवशी दुपारी चारपर्यंत येतो म्हणून सांगितले. मी तहसीलदारांची सायंकाळी सहापर्यंत वाट पाहिली आणि निघून गेलो. ते मला रात्री अकरापर्यंत फोन करत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, तुम्ही म्हणताय ते चुकीचं असू शकेल. त्याने सरळ सांगितले की तहसीलदारांना पैसे द्यायचे आहेत म्हणून. जर तो माणूस दीड लाख रुपयांमध्ये काम करून देत होता, तर मग आता ते का होत नाही, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला.
कोकाटे म्हणाले, त्या महिलेच्या रस्त्याच्या कामासंदर्भात मी किमान पाच वेळा तहसीलदारांना फोन केला. त्यांचं पोरगं माझ्याकडे रडत यायचं. त्यांची मुलगी बारावीला आहे, तिला चारी ओलांडून जावं लागायचं. कुठल्या पक्षाचा असेना केवळ पुढाऱ्यांनी सांगितलं की, ‘हा बाबा काय काम करत नाही.’
संजय कोकाटे यांनी वर्ग दोनच्या जमिनीसंदर्भात केलेल्या आरोपावर तहसीलदारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, वर्ग दोनच्या जमिनीचे अधिकार मला नाहीत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय मला ते अधिकार नाहीत. वर्ग दोनच्या जमिनीचे लॉक खोलायचे अधिकार माझ्याकडे नाहीत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आल्याशिवाय मला काही करता येत नाही.
तहसीलदारांच्या उत्तरावरही संजय कोकाटे यांनी ‘... मग तुम्ही तुमच्या माणसाच्या गाडीत बसून माझ्या घरी आला होता की नाही. तुम्ही माझ्या घरी आला होता की नाही’ असा सवाल उपस्थित केला. त्यावर तहसीलदारांनीही हो आलो होतो, असे मान्य केले.
आमदार पाटील यांनी शेतकरी, सर्व सामान्यांची कामे गतीने करण्यासंदर्भात सक्त सूचना केली. तसेच मोजणी अधिकाऱ्याला रस्ता मोजून न दिल्यास तुमच्या निलंबानाची शिफारस करेन, असा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.