
Solapur, 17 February : मी नावालाच तुतारीवाला, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली, अशी जाहीर विधाने करणारे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची पावले आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पडताना दिसत आहेत. कारण, शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे छायाचित्र जाऊन त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आले आहेत. याशिवाय फ्लेक्सवरून आता तुतारीही गायब झाली आहे, त्यामुळे राजू खरे हे नावालाच राष्ट्रवादीचे आमदार आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
राजू खरे (Raju Khare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली होती. प्रबळ विरोधक असूनही राजू खरे यांनी माजी आमदार राजन पाटील विरोधकांची मोट बांधून विधानसभा निवडणूक जिंकली होती. राजू खरे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि अवघ्या काही दिवसांत आमदार झाले.
आमदार राजू खरे यांनी पंढरपूरमध्ये शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमासाठी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रित केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमदार खरे यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनरवरून तुतारी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोटो गायब झाला आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांचे फोटो झळकले आहेत.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजू खरे हे निवडून आले आहेत. त्या पक्षाचे नेते आणि पक्षाचे चिन्ह खरे यांच्या फ्लेक्सवरून गायब झाले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चर्चेला एकच उधाण आले आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजू खरेंनी यापूर्वी दोनदा राष्ट्रवादीबाबत भाष्य केलंय
पंढरपूर येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी ‘आपण नावालाच तुतारीवाला आहे, राज्यातील महायुतीचे सरकार हे आपले आहे,’ असे विधान केले हेाते. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत भाष्य केले होते.
विधानसभा निवडणुकीत मला चुकून तुतारी घ्यावी लागली, असे या बैठकीत म्हटले होते. त्या वेळी ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार असल्याचे लक्षात आणून दिले होते. त्यानंतरही खरे हे आपल्या बोलण्यावर ठाम राहिले होते. त्यामुळे खरे पाच वर्षे पवारांसोबत राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.