
Solapur, 05 September : माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खनन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरात गाजत आहे. त्यातील संभाषणावरून उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टीका होत आहे. मात्र, अजितदादांच्या बचावासाठी त्यांचे खंदे समर्थक तथा सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मैदानात उतरले आहेत. त्याबाबत बोलताना परीविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना ‘कोणाचा तरी फोन आला म्हणून त्या कारवाई आल्या,’ असे विधान केले आहे. त्यामुळे त्या कोणाच्या फोनवरून कारवाईसाठी आल्या, अशी चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भात स्पष्टीकरण देताना उमेश पाटील म्हणाले, परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) अंजली कृष्णा या कोणाचा तरी फोन आला; म्हणून कारवाईसाठी आल्या. त्यांना तो अधिकार नाही. पण, त्या आल्या. गावकऱ्यांना त्या पोलिस अधिकारी आहेत; म्हणून काय माहिती. त्यांच्या अंगावर युनिफार्मही नव्हता. त्या पोलिस गाडीवर न येता दुचाकीवर बसून आल्या होत्या, त्यामुळे त्या अधिकारी आहेत, हे लोकांना कसं कळणार?
शासकीय कामात अडथळा कधी ठरतो, तर ते शासन आहेत, हे कळलं तर पाहिजे ना. त्यांनी म्हटलं म्हणून ग्रामस्थांनी त्यांना डीवायएसपी मानायचं का? त्यांनी आयकार्ड दाखवलं नाही, त्यामुळे लोकांनी त्या डीवायएसपी आहेत, हे कसं ओळखायचं? तहसीलदारांनीही त्यांना कळवलं नव्हतं. पण सर्वांत महत्वाचे म्हणजे या कामाची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे, त्यासाठी ग्रामस्थांना का जबाबदार धरतात,? असा सवालही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन हाताळण्यात सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त आहे. तुम्ही तात्पुरती कारवाई थांबवा. मी तहसीलदारांना सांगतो. त्यांना माझा फोन आहे, म्हणून सांगा. आपण जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर बघूया. म्हणजे अधिकृत आहे की अनधिकृत आहे, हे तपासून कारवाई करू, असे अजितदादांनी त्यांना सांगितले होते
कार्यकर्त्यांनी नेत्यांना फोन लावणे, यात गैर काय आहे. कार्यकर्त्यांचा फोन आल्यानंतर एवढा सगळा मॉब पाहिल्यानंतर एकटी असलेल्या महिला अधिकाऱ्याला धोका होऊ नये, यासाठी त्यांनी तेथून निघून जाणे आणि त्यानंतर रितसर कारवाई करणे, ही बाजूही पाहिली पाहिजे, असेही उमेश पाटील यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन केलेले नाही. या प्रकरणात विर्पयास केला जात आहे. कारण नसताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे, त्यांनी अधिकाऱ्याला दमबाजी केली म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण उमेश पाटील यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.