Kolhapur News: वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे देशाच्या कर संकलनात चांगली वाढ झाली आहे. कराच्या पैशातून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला झपाट्याने मूर्त स्वरूप येत आहे. जीएसटी काऊन्सिलमुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत व्यक्त केली.
2014 नंतर भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून, भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पना देशाला एका वेगळ्या उंचीवर नेत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार धनंजय महाडिक यांनी, एका महत्त्वाच्या विषयावर सविस्तर भूमिका मांडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
13 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेत जीएसटी कायदा सुधारणा विधेयक मांडले गेले. तर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत आले. त्याला खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला. जीएसटी काऊन्सिल बनवण्यासाठी अशी सुधारणा आवश्यक असून, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले 6 कोटी दावे, या काऊन्सिलमुळे कमी होतील, असा आशावाद खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला.
विकसित भारत संकल्पनेत जीएसटीचा महत्त्वाचा वाटा असून, कोरोनाकाळात राज्य सरकारच्या कर संकलनात घट झाली तरी, केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत दिल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले.
गेल्या महिन्यात जीएसटी मधून 1 लाख 67 हजार कोटी रूपयांचे केंद्र सरकारला उत्पन्न मिळाले. तर वर्षभरात 20 लाख कोटी रूपयांचे संकलन होईल, अशी आशा आहे. त्यातून संपूर्ण देशात अनेक पायाभूत सुविधांची वेगाने उभारणी होत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
12 कोटी शेतकऱ्यांना अनुदान, 80 कोटी जनतेला मोफत रेशनधान्य, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण, वंदे भारत आणि मेट्रो रेल्वेची सुरवात, विमानतळांची वेगाने उभारणी अशा अनेक कामांसाठी जीएसटीमधून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग होत असल्याचे खासदार महाडिक म्हणाले.
2014 नंतर मोदी सरकार केंद्रात आल्यावर अनेक स्टार्टअप कंपन्या वाढल्या, त्यातून रोजगार वाढले, लघु आणि मध्यम कंपन्या वाढल्या, डीमॅट खात्यांची संख्या वाढली. इंटरनेटचा वापर वाढला, विमान आणि हॉटेल व्यवसायाला वाढता प्रतिसाद मिळाला असे सांगून, ऑनलाईन आणि डिजिटल व्यवहारामुळे लोकांचा वेळ वाचला. शिवाय भ्रष्टाचाराला आळा बसला, असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले.
आता लवकरच पेट्रोल अणि डिझेल इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावे, जेणेकरून इंधनाचे दर कमी होतील, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik ) यांनी बोलून दाखवली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करतोय. आज जागतिक स्तरावर भारत पाचवी आर्थिक महासत्ता आहे.
लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जाईल आणि विकसित भारत संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी खात्री खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलून दाखवली. त्याला अन्य सदस्यांनी बाके वाजवून पाठिंबा दिला.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.