Solapur News : राज्याचे माजी सहकार मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचे भावी खासदार म्हणून धाराशिव जिल्ह्यात बॅनर झळकले आहेत. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे, तसा दावाही शिंदे गटाकडून नुकताच करण्यात आलेला आहे. आता देशमुख यांच्या बॅनरमुळे युतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Rohan Deshmukh's banner as a future MP was put up in Dharashiv)
शिवसेना-भाजप युतीमध्ये धाराशिवची जागा आजपर्यंत शिवसेना लढवत आली आहे. मात्र, 2019 मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी बनवली. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाते. मागच्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून लढले होते, तर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीमध्ये धाराशिवची जागा कोण लढवणार याची प्रचंड उत्सुकता जिल्ह्यात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेने मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, तुल्यबळ उमेदवार भाजपकडे आहे. दुसरीकडे, ही जागा राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे अजित पवार गटाकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे महायुतीमध्येच ही जागा कोणाकडे असणार, हे अजून निश्चित झालेली नाही.
महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेसंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच भाजप नेते सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचे ‘भावी खासदार’ म्हणून धाराशिवमध्ये बॅनर झळकले आहेत. देशमुख यांचे कार्यक्षेत्र आणि गृह जिल्हा हा सोलापूर आहे. सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत. पण, साखर कारखान्यांच्या माध्यमातून देशमुख यांचा उमरगा आणि धाराशिव जिल्ह्यात संपर्क आहे. त्यामुळेच देशमुखांच्या चाहत्यांकडून भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत.
सुभाष देशमुख हे आमदार असताना भाजप त्यांच्या मुलाला खासदारकीचे तिकिट देणार का, हा खरा प्रश्न आहे. अपवाद वगळता भाजपने हे कटाक्षाने टाळले आहे. त्यामुळे देशमुख खरोखरच धाराशिवमधून लोकसभेची निवडणूक लढवणार की नुसतीच बॅनरबाजी होणार, अशी चर्चाही सोलापूर आणि धाराशिवमध्ये रंगली आहे.
(Edited By : Vijay Dudhale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.