नांदणी येथील जैन मठामधून महादेवी हत्तीण अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यावर संतापाचा भडका उडाला आहे.
पेटा संस्थेने आरोप केला आहे की महादेवीचा वापर व्यापारी तत्त्वावर, मोहरमसारख्या धार्मिक मिरवणुकांमध्ये आणि भीक मागण्यासाठी केला जात होता.
तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धातूच्या अंकुशाचा वापर केला जात होता, तसेच मुलांना तिच्या सोंडेवर बसवण्यात येत होते, असेही आरोप आहेत.
Mumbai News : नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण अंबानी यांच्या वनतारा या प्रकल्पात नेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर महादेवीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापुरकरांनी केला आहे. त्यासाठी सह्यांच्या मोहिमेसह अंबानीच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ कार्ड बॉयकॉट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील वातावरण वनताराच्या विरोधात असून सरकारविरोधात देखील टीका केली जातेय. समाजात काही गैरसमज पसरले गेल्याचा खुलासा वनताराकडून करण्यात आला आहे. दरम्यान आता पेटा (PETA) या विख्यात प्राणीमित्र संघटनेकडून धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. पेटाने या हत्तीणीचा वापर व्यापारी तत्त्वावर तर मोहरमसह अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये केला जात होता. तर तिला भीक मागण्यासाठी देखील नेले जात होते, असा आरोप केला आहे. तसेच तिच्या सोंडेवर लहान मुलांना बसवण्यात येत होते. तिला नियंत्रीत करण्यासाठी धातूच्या अंकुशाचा वापर केला जात होता, असा दावाही केला आहे. (PETA Alleges Shocking Abuse of Elephant Mahadevi by Jain Math Before Transfer to Ambani’s Vanatara Project)
पेटाने महादेवी आर के टी ई डब्ल्यू टी (वनतारा) येथे हलवण्याबाबत माहिती देताना, संघटना 2022 पासून या हत्तीची माहिती घेत असल्याचे म्हटलं आहे. तसेच 2023 मध्येच याबाबत वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे तक्रार केली होती. त्यावेळी हत्तीणीची स्थितीबाबत छायाचित्रे, पशुवैद्यक तज्ञांचे अहवाल, शारीरिक दुखापती आणि मानसिक अवस्थेसह तिचा होणार वापर याबाबत पुरावे देण्यात आले होते.
महादेवीला कोणत्याही परवानगी विनाच 2012 ते 2023 पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये नेण्यात आल्याचा दावाही पेटाने केला आहे. तर त्यावेळी तेलंगणामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा देखील झाल्याचा दावा केला आहे. त्यावेळी सार्वजनिक मिरवणुकीत अवैधरीत्या हत्तीणीचा वापर केल्याने हत्तीणीचा माहूत इस्माईल याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 25 भरल्यानंतर सोडण्यात आले होते.
तसेच या हत्तीणीचा वापर हा व्यापारी तत्त्वासह मोहरम आणि अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये केला जात होता. तिला भीक मागण्यासाठी देखील फिरवले जात होते. तर तिच्या सोंडेवर लहान मुलांना बसवले जात होते. ज्या धातूच्या अंकुशावर बंदी आहे त्याचा वापर तिला नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात होता. इतकेच नाही तर हत्तीणीची पूजा करण्यासाठी मठातर्फे बोली लावली जात होती. त्यामुळे या हत्तीणीचा वापर पैशांसाठीही होत होता हे सिद्ध झाले आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून उच्चस्तरीय समितीने याबाबत चौकशी सुरू केली होती. तर हत्तीणीची अवस्था सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी संबंधित मठाला देण्यात आला होता. मात्र त्यात कोणतीच सुधारणा न झाल्याने 27 डिसेंबर 2024 रोजी उच्चस्तरीय समितीने आदेश देऊन या हत्तीणीला जामनगरच्या आर के टी ई डब्ल्यू टी मध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. येथे प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास, पशुवैद्यक तज्ञांमार्फत काळजी, कळपातील आपल्या जातीच्या अन्य प्राण्यांमध्ये मिसळण्याची संधी तसेच विशेष प्रशिक्षित माहुत आदी सोयीसुविधा आहेत.
दरम्यान वनताराने हत्तीणीच्या मागणीबाबत कोणतीच मागणी केलेली नाही, असाही खुलासा पेटाने केला आहे. तर हत्तींचे हित तसेच त्यांची काळजी घेण्यातील वनताराची क्षमता आणि त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन उच्चस्तरीय समितीनेच या हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
1. महादेवी हत्तीण कुठून कुठे नेण्यात आली आहे?
ती नांदणी येथील जैन मठातून अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आली आहे.
2. पेटा संस्थेने काय आरोप केले आहेत?
महादेवीचा वापर व्यावसायिक उपक्रमांसाठी, धार्मिक मिरवणुकांमध्ये, भीक मागण्यासाठी आणि मुलांना सोंडेवर बसवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप पेटा संस्थेने केला आहे.
3. या प्रकरणावर जनतेची काय प्रतिक्रिया आहे?
कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, जिओ सिमकार्डच्या बहिष्काराची मोहिम, मोर्चा आणि महादेवी परत आणण्याची मागणी जोर धरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.