
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्यातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आता पुन्हा मैदानात उतरणार आहेत. गत 2-3 महिन्यात मला अडचणींमुळे बाहेर पडता आले नाही, पण आता मी बाहेर पडणार आहे आणि लोकांमध्ये जाऊन आमचे काय चुकले हे विचारणार आहे, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हंटले आहे. नुकतेच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बाणगंगा धरण पाणी पूजन समारंभ पार पडला. यानंतर ते बोलत होते.
रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. याच वैरातून रामराजे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यापासून फारकत घेतली. भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उमेदवारी जाहीर झालेल्या दीपक चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पाठवले. तर अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कांबळे पाटील यांना आयात करून तिकीट दिले अन् निवडूनही आणले. हा रामराजेंसाठी मोठा धक्का होता.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या कृतीमुळे अजित पवारही चांगलेच दुखावले. "तुम्ही फक्त दीपक चव्हाणांच्या प्रचारात जावाच, तुम्ही आमदार कसे राहता हेच बघतो", असा इशाराच त्यांनी रामराजेंना दिला होता. "श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि असा प्रचारही करायचा हे योग्य नाही", असं म्हणत रामराजेंच्या अंतर्गत बैठकांवर भाष्य केलं होतं. तिथूनच दोघांमध्ये अंतर पडत गेले.
मात्र निवडणूक संपताच रामराजेंनी अजितदादांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. ते अजित पवार यांच्या बैठकीतही उपस्थित राहिले होते. वरिष्ठ नेत्यांचा मान देत त्यांना अजितदादांनी पहिल्या रांगेत बसवले होते. पण या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. निवडणुकीनंतर तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत एकापाठोपाठ वाढ होत गेली. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण, पुणे आणि मुंबईतील घरांवर एकाचवेळी प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती. श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला.
या अडचणीतूनही आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे. रामराजे म्हणाले, आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांनीही साथ दिली. पण मागच्या 2-3 महिन्यांत काही अडचणीमुळे मला वेळ देता आला नाही. आता मी गावोगावी बैठका घेऊन लोकांनाच विचारणार 'आमचं काय चुकलं ते सांगा? जे चुकलं ते दुरुस्त करून घेऊ'. जनतेला सांगणार आहे आमचं जे चुकलं असेल त्याहीपेक्षा तुमच्यापुढे जे नेतृत्व तयार होत आहे ते नेतृत्व तुम्हाला तुमच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. झालं ते झालं.
मी हार मानणारा माणूस नाही, बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलण्याबरोबर तालुक्याची बसवलेली घडी कोणालाही विस्कटू देणार नाही. विधानसभेला 10-20 हजारांनी आपला उमेदवार पडला असला तरी राजकारणातील आपला मूलभूत पाया आजही मजबूत आहे. तरुणांना भूतकाळातील दुष्काळी परिस्थितीची विपरीत परिस्थितीत केलेल्या संघर्षाची जाणीव करुन देण्याची गरज आहे. आमच्याकडून तसेच आमच्या कार्यकर्त्याकडून काही चुका झाल्या असतील. पण झालेल्या चुका दुरुस्त करून आपणाला पुढे जायचे आहे. तरुण पिढीचा मी पाठीराखा आहे. त्यांना सोबत घेऊन आपणाला पुढे जायचे आहे, असा आशावादही रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.