अहमदनगर - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने शेतकरी समृद्धी मंडळ नावाचा पॅनल उभा केला आहे. या पॅनलचा प्रचार करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) आज अकोल्यातील विठ्ठल लॉन्स येथे आले होते. या सभेत त्यांनी मधुकरराव पिचड यांच्यावर जोरदार टीका केली. ( Pitched chairman in 'Agastya', then how can the Gaikar be guilty? : Tola given by Ajit Pawar )
या प्रचार सभेला आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, मधुकरराव नवले, अमित भांगरे, डॉ. अजित नवले, सुनीता भांगरे, कैलास वाकचौरे, कपिल पवार, भानुदास तिकांडे, यमाजी लहामटे, विजय वाकचौरे, मारुती मेंगाळ, मच्छिंद्र धुमाळ, शांताराम वाळुंज, सुरेश नवले, कारभारी उगले आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून अजूनही कर्जमुक्त झालेला नाही. बारामतीजवळील तीन साखर कारखान्यांत 3 हजार रुपयांपर्यंत एफआरपी दिली जाते. अगस्ती कारखान्याचा भाव 2500 रुपये टन आहे. बारामती भागा एवढेच कष्ट व शेती खर्च करूनही शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो याला काय कारण आहे. चांगले व्यवस्थापक मंडळ व मार्गदर्शन असेल तर कारखाना चांगला चालतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अगस्ती कारखान्यातील आर्थिक परिस्थितीला सीताराम गायकरांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न होते आहे. या कारखान्याचा 2 ते 3 वर्षांचा अपवाद वगळता चेअरमनपद मधुकरराव पिचड यांच्याकडे होते. पिचड चेअरमन असताना गायकरांना जबाबदार कसे धरले जाते. एखाद्या बँकेत अथवा पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्यास त्याला जबाबदार चेअरमनला धरले जाते. पंचांना नाही. तुमच्या बरोबर राहिले तर चांगले. सोडले तर भ्रष्टाचारी, असा टोलाही त्यांनी लगावला.
दुजाभाव केला नाही
ज्यावेळी मधुकरराव पिचड मंत्री होते. त्यानंतर वैभव पिचड आमदार होते. आता डॉ. किरण लहामटे आमदार आहेत. यात केव्हाही आम्ही निधी देताना दुजाभाव दाखविला नाही. कारण अकोल्यातील शेतकरी जगला पाहिजे अशी आमची भावना आहे. अगस्ती कारखान्याच्या स्थितीत 32 वर्षांत सुधारणा झाली नाही त्याला नेतृत्त्व जबाबदार आहे. संगमनेरमधील कारखान्यांत जे घडते ते अगस्ती कारखान्यात घडत नाही. या कारखान्यात खूप काही करण्यासारखे आहे मात्र केले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.
ते एकत्र येऊन बोलले नाहीत
अगस्ती कारखाना निवडणुकीबाबत मी किरण लहामटे, अशोक भांगरे, सीताराम गायकर, दशरथ सावंत, अजित नवले आदींना एकत्र येऊन माझ्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र ते कधी एकत्र आले नाहीत. केवळ अजित नवले हेच माझ्याशी संपर्क साधला मात्र मला सर्वजणांशी एकत्रित बोलायले, असे ही त्यांनी सांगितले.
वयोमानानुसार मार्गदर्शक व्हा!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही वय जास्त झाले आहे त्यांनाही पदापासून दूर रहायला सांगा असे मधुकरराव पिचड यांनी सांगितले होते, यावर अजित पवार म्हणाले, वयोमानानुसार पदांपासून दूर जायला हवे. शरद पवार हे सध्या पदावर नाहीत. मी, जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, किरण लहामटे आदींवर त्यांनी जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. ते आम्हाला मार्गदर्शन करतात. कामाजी जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात. त्यामुळे वयोमानानुसार मार्गदर्शक व्हावे, चेअरमन नको. अकोले एज्युकेशनवर तीनच विश्वस्त. गायकर विरोधात गेले म्हणून त्यांनी राजीनामा दिला. समाजातील धुरीणांनी काढलेल्या शिक्षणसंस्था एकाच कुटुंबाच्या कशा झाल्या. आपण असो, नसो संस्था राहणार. त्यामुळे ज्याच्यात कर्तृत्त्व गुण त्यांनाच पुढे नेले पाहिजे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.