
Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत दिलजमाई झालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. पारंपारिक कट्टर विरोधक माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवनकर हे निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या छताखाली एकत्र आले. मात्र आता दोन्ही गटात वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. इचलकरंजी या एकाच शहरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यालय झाल्याने पुन्हा एकदा आवाडे आणि हळवणकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात पुन्हा एकदा या दोन्ही गटांमध्ये मंडल अध्यक्ष व्हिडिओवरून देखील छुपा संघर्ष समोर आला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये आल्यानंतर पुत्र आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी भाजपची उमेदवारी निश्चित करण्यात आली. उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा गट नाराज दिसला. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीत येऊन हाळवणकर यांची नाराजी दूर केली. दोन्ही गटातील संघर्ष कमी होण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समिती देखील नेमण्यात आली. मात्र सातत्याने दोघांमधील संघर्ष पुन्हा एकदा या ना त्या कारणाने दिसून येत आहे.
सध्या भाजपमध्ये मंडल अध्यक्षांच्या निवडी सुरू आहेत. इचलकरंजी शहरात तीन मंडळ अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. त्यामध्ये तिसऱ्या एका मंडल अध्यक्षावरून माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटात संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. सध्या दोन मंडल अध्यक्षपदाच्या नावाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर उर्वरित एका मंडल अध्यक्ष निवडीबाबत आवाडे-हाळवणकर गटात एकमत न झाल्यामुळे गुंता वाढला आहे. दोन माजी नगरसेवकांची यासाठी चुरस सुरू आहे. यामध्ये कोणाला मंडल अध्यक्षपदाची संधी मिळणार, याकडे भाजप वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान उद्या 22 एप्रिल रोजी या निवडी होण्याची शक्यता असून यापूर्वी इचलकरंजी शहरात शहराध्यक्ष म्हणून भाजपकडून एका पदाला मान्यता होती. आता भाजपच्या नव्या धोरणानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन मंडल अध्यक्षांची निवड होणार आहे.
इचलकरंजी पूर्व, इचलकरंजी पश्चिम व इचलकरंजी ग्रामीण असे तीन मंडल अध्यक्ष निवडले जाणार आहेत. यातील दोन पदे आवाडे व एक पद हाळवणकर गटाला देण्याचा पक्षीय पातळीवर समझोता झाला असल्याची माहिती आहे. एकीकडे समझोता झाला असला तरी इचलकरंजी ग्रामीण मंडल अध्यक्षाचे नाव ऐनवेळी बदलण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या घडामोडी घडत असून इच्छुकांची मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे.
आवाडे गटाने ज्या मंडल अध्यक्षाचे नाव सुचित केले होते. त्याला हाळवणकर गटाकडून आक्षेप घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे हाळवणकर गटाकडून शहापुरातील एका युवा माजी नगरसेवकाचे नाव चर्चेतून पुढे येत आहे. त्यामुळे या पदासाठी दोन माजी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यातील कोण बाजी मारणार, याकडे भाजपच्या वर्तुळात विशेष लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.