

Solapur, 05 March : राज्यसभेच्या सात जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ खेळत आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य घरातून आलेल्या वाघमारेंना संधी देत शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. ज्योती वाघमारे यांच्या रुपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे वाघमारेंना दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.
राज्यसभेच्या (Rajya Sabha) सात जागांसाठी भाजपकडून बुधवारी (ता. ०४ मार्च) चार नावे जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झाले होते, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारीकडे सर्वांचे डोळे लागले होते.
शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांची नावे चर्चेत होती. पण शिंदे यांनी सर्वसामान्य घरातून पुढे आलेल्या वाघमारे यांनी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सात जागांसाठी सातच उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
वाघमारे यांची पार्श्वभूमी ही आंबेडकरी चळवळीतील असून त्यांचे वडिल हे नगरसेवक होते. त्यांची मातृभाषा तेलगू असली तरी त्यांनी इंग्रजीतून पीएचडी केली आहे, तर मराठी भाषेवर त्यांचे प्रभूत्व आहे. त्या सोलापुरातील महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.
वाघमारे ह्या २०१४ मध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतरच्या पुढील काळात त्या राजकारणापासूर दूर गेल्या होत्या. मात्र, २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडली. त्या फुटीनंतर वाघमारे ह्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राज्याच्या प्रवक्त्या करण्यात आले होते. आता त्यांना एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर संधी दिली आहे.
ज्योती वाघमारे यांच्या रुपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी राज्यसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले आहे.
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसकडून १९९२ ते १९९८ या काळात पहिल्यांदा राज्यसभेवर गेले होते. त्यानंतर २००६ मध्ये शिंदे हे दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही वेळा ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, शिंदे यांच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील घराण्यातील तरुण चेहरा रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली होती.
राज्यसभा सदस्य असलेल्या सुप्रिया सुळे ह्या २००९ मध्ये बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यांनी २००९ ते २०१२ अशी तीन वर्षे राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले, त्यामुळे आक्रमक चेहरा असलेल्या ज्योती वाघमारे यांच्या रुपाने सोलापुरातील तिसऱ्या नेत्याला राज्यसभेची संधी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.