

Pune News : पुण्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच सोमवारी (ता. ३१) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, विविध मोर्चांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्ष संघटनेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही बैठक केवळ प्रदेश कार्यकारिणीची बैठक न राहता, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एकप्रकारची ‘कार्यशाळा’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या बैठकीसोबतच पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे ‘शाळा’ घेतल्याची चर्चा अधिक रंगली आहे.
गेल्या काही दिवसांत पुण्यातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला मिळालेला मोठा प्रतिसाद भाजपसाठी चर्चेचा विषय ठरला. या पार्श्वभूमीवर भाजपनेही विद्यापीठांमध्ये कार्यक्रम घेतले. मात्र, या कार्यक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये बदलत असलेल्या राजकीय वातावरणाची दखल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतल्याचे बोलले जात आहे.
‘छात्रों की गूंज’चा मुद्दा बैठकीत चर्चेत?
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि त्याला काऊंटर करण्यासाठी भाजपकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांना मिळालेला तुलनेने कमी प्रतिसाद, यावरून स्थानिक नेत्यांना फडणवीसांनी जाब विचारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सीओईपी महाविद्यालयातील गोंधळाचाही मुद्दा बैठकीत चर्चेला आल्याचे सांगितले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या मुद्द्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आलेली भूमिका आणि ती मांडताना वापरण्यात आलेल्या शब्दांबाबतही फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. संवेदनशील विषयांवर भूमिका मांडताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे संकेत त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
युवा मोर्चाच्या आंदोलनातील गर्दीवरही नाराजी?
भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनांना अपेक्षित गर्दी होत नसल्याचा मुद्दाही फडणवीसांनी उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पुण्यातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कडून सातत्याने भाजपचे नेते आणि पक्षाच्या कामकाजावर टीका केली जात आहे. मात्र, त्याला पक्षाकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले जात नसल्याचा मुद्दाही फडणवीसांनी उपस्थित केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
गटबाजीवरूनही कानउघडणी?
पुण्यात भाजपच्या स्थानिक पातळीवर महापालिका, आमदार, खासदार आणि विविध नेत्यांचे स्वतंत्र गट तयार झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. या गटबाजीचा फटका पक्ष संघटनेला बसू नये, यासाठी फडणवीसांनी स्थानिक नेत्यांना स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे राज्यातील प्रमुख राजकीय आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी भाजपकडून सुरू असताना, पुण्यातील अंतर्गत मतभेद, गटबाजी, युवकांमधील पक्षाचा प्रभाव आणि सोशल मीडियावरील टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या मुद्द्यावरही पक्षश्रेष्ठी गंभीर असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक नेत्यांनी आपापल्या गटांपेक्षा पक्षाला प्राधान्य द्यावे, अन्यथा नेतृत्वाकडून वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात, असा निर्वाणीचा इशाराच फडणवीसांनी दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.