

Pune Crime News : पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात एका आरोपीवर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. न्यायालयात हजेरी लावून बाहेर पडणाऱ्या 35 वर्षीय मंदार किवळे याला सहा जणांच्या टोळक्याने लक्ष्य केले. हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार केला, मात्र गोळी लागली नाही. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. जखमी किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
न्यायालयातून बाहेर पडताच हल्लेखोरांनी साधला निशाणा
मंदार किवळे हा एका हत्या प्रकरणात आरोपी असून, न्यायालयीन सुनावणीसाठी तो शिवाजीनगर सत्र न्यायालयात आला होता. न्यायालयातून बाहेर पडताना गेट क्रमांक चारजवळ त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळी लक्ष्यावर न लागल्याने हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले. दुपारच्या वेळी न्यायालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणीच आरोपीवर हल्ला झाल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही चर्चा सुरू झाली आहे. किवळे हा हल्ल्याच्या चार दिवस आधीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे निर्देश
घटनेनंतर पुणे पोलिसांनी वेगाने तपास करत हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना आज (ता. 26) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कदम यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर हल्लेखोरांची पार्श्वभूमी, ते कुठून आले आणि त्यांच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागवण्यात आली. या प्रकरणाकडे सरकार गंभीरतेने पाहत असून, सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यासह अन्य शहरांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा घटना घडवल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. अशा घटनांमध्ये कोणतीही दया दाखवली जाणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पुणे पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत मकोका अंतर्गत कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. माहिम येथील प्रकरणातील आरोपींचाही शोध सुरू असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र हे विकसित राज्य असून, अशा घटनांमुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे कदम यांनी म्हटले. पुणे पोलिस आयुक्त घटनास्थळी का गेले नाहीत, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अवैध शस्त्रांची आवक होत असल्याच्या मुद्द्यावर पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.