

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी अंतर्गत वादांनी गाजत आहे. लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यातील संघर्ष मिटल्याचा दावा झाला असला तरी बरडे बैठकाला गैरहजर राहिल्याने शंका निर्माण झाल्या आहेत.
खैरे यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले, पण बरडे यांच्या अनुपस्थितीमुळे वाद मिटला की फक्त दिखावा केला, यावर शिवसैनिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेने धनंजय डिकोळे आणि गणेश वानकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
Solapur, 09 December (प्रभूलिंग वारशेट्टी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज (ता. 09 डिसेंबर) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात खैरे यांनी सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. मात्र, बरडे हे बैठकीकडे फिरकलेच नाहीत, मुलीच्या कार्यक्रमामुळे आपण बैठकीला येऊ शकत नसल्याचे बरडेंनी स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे खैरेंनी दासरी-बरडे यांच्यातील वाद खरंच मिटविला की नुसताच फार्स केला, अशी चर्चा शिवसैनिकांमध्येच रंगली आहे.
जिल्हाप्रमुख अजय दासरी (Ajay Dasari ) आणि लोकसभा प्रमुख बरडे यांच्यात काही दिवसांपासून जोरदार वाद रंगला आहे. बरडेंच्या मुलांच्या पोस्टचा दाखला देत दासरी यांनी त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी दासरी यांना प्रतिआव्हान देताना ‘प्रभाग 13 मधून दासरी यांनी शिवसेनेचे दोन जरी नगरसेवक निवडून आणले तर आपण त्यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करू,’ असे चॅलेंज दिले आहे, त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत वाद उफाळला आहे.
दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जिल्हाप्रमुख अजय दासरी उपस्थित होते. मात्र, बरडे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे. या अनुपस्थितीबाबत खैरे यांनी बरडेंना विचारले असता, त्यांनी मुलीचा कार्यक्रमाचे कारण दिले आहे. दुसरीकडे या बैठकीला दासरी उपस्थित होते, त्यामुळे बरडेंनी बैठक टाळल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटातून चर्चिली जात आहे.
बरडे बैठकीला आलेले नसतानाही खैरे यांनी पक्षाच्या दोन नेत्यांमधील वाद मिटल्याचा दावा केला आहे, त्यामुळे ठाकरेंच्या सोलापुरातील शिवसेनेतील वाद खरंच मिटला की खैरे यांनी वाद मिटविल्याचा नुसताच फार्स केला, असा सवाल उपस्थित होत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बेदिली चव्हाट्यावर आल्याने पक्ष यश कसा मिळविणार, असा प्रश्न शिवसैनिकांनाच पडला आहे.
गणेश वानकर, धनंजय डिकोळे समन्वयक
मनसेसह महाविकास आघाडी सोलापूर महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत. त्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत समन्वय राखण्यासाठी तसेच पक्षाची रणनीती ठरवून ती अंमलात आणण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे आणि जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार खैरे यांनी या दोघांवर ही जबाबदारी सोपवली आहे.
1) प्रश्न: बरडे आणि दासरी यांच्यातील वाद खरोखर मिटला का?
उत्तर: खैरेांनी दावा केला पण बरडे यांच्या गैरहजेरीमुळे शंका कायम आहेत.
2) प्रश्न: बरडे बैठकीला का आले नाहीत?
उत्तर: मुलीच्या कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले.
3) प्रश्न: सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत कोण समन्वयक आहेत?
उत्तर: धनंजय डिकोळे आणि गणेश वानकर यांची समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे.
4) प्रश्न: शिवसेना कोणत्या आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे?
उत्तर: शिवसेना मनसेसह महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.