

सोलापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी (काँग्रेस, रा.काँ.-शरद गट, शिवसेना-उद्धव, माकप) एकत्र लढवणार, वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षानेही पाठिंबा घोषित केला आहे.
मनसेने बाळा नांदगावकर यांच्या ग्रीन सिग्नलनंतर औपचारिकरीत्या महाविकास आघाडीत प्रवेश केला, ज्यामुळे सोलापुरात आघाडी अधिक मजबूत झाली आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठकीत रणनीती, समन्वय, वाद निवळणे आणि जागावाटपाबाबत प्रक्रिया ठरवण्यात आली, तर एमआयएमला न घेण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे.
Solapur, 09 December : सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रितपणे लढण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतला आहे. या आघाडीला वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षानेही पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सोलापूमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री झाली आहे. त्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांची संमती आहे, त्यामुळे महायुतीसमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान महापालिका निवडणुकीत उभे करण्याचा प्रयत्न होत आहे.
महानगरपालिका निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)हे आज (ता. 09 डिसेंबर) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत सोलापूरमधील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. त्या बैठकीतच सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली.
सोलापुरातील (Solapur) बैठकीसाठी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, धनंजय डिकोळे, गणेश वानकर, संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, शहरप्रमुख नाना मोरे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रिया बसवंती, अमिता जगदाळे, मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, माकपचे ॲड. अनिल वासम आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुका संपल्याने येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय पक्षांनी त्याची तयारी चालवली आहे. महाविकास आघाडीने महापलिकेचे रणांगण एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे.
सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी सुरुवातीला पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यात लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांशी चर्चा केली. त्यानंतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत विचारविनिमय केला. त्यानंतर खैरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्या बैठकीनंतर या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेसाठी महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली.
या बैठकीला मनसेचे विनायक महिंद्रकर यांची उपस्थिती होती. ते मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची परवानगी घेऊन महाविकास आघाडीच्या बैठकीला आले होते. त्यामुळे मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे. मनसे आणि महाविकास आघाडीच्या युतीची पहिली घोषणा सोलापुरात झाली आहे, त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीत मनसेची एन्ट्री निश्चित झाली आहे. त्याबाबत निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे, त्यास नांदगावकर यांच्याकडून पूर्वसंमती घेण्यात आलेली आहे.
याबाबत माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, सोलापूर महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत. महाविकास आघाडीत मनसेची एन्ट्री झाली आहे. या आघाडीला वंचित आघाडी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीपुढे आमचे कडवे आव्हान असणार आहे.
बाळा नांदगावकरांचा ग्रीन सिग्नल
मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या अनुंंषगाने बोलावलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला मनसेला आमंत्रित केले होते. अनेक वर्षांनंतर दोन भाऊ (ठाकरे बंधू) एकत्र येत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. भाजपने सर्व पक्ष संपवण्याचे षडयंत्र रचले आहे. महाआघाडी म्हणून महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयएमला सोबत न घेण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
ज्या प्रभागात ज्या पक्षाची ताकद अधिक असेल त्या प्रभागाचा अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतर जागावाटप ठरणार आहे. महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय पक्षनेते बाळा नांदगावकर यांना सांगितला आहे. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना ग्रीन सिग्नल दिला आहे. पुढील रणनीतीसंदर्भात मुंबईला भेटायला बोलावले आहे.
मनसेसह महाविकास आघाडी निश्चित : गादेकर
एमआयएम पक्षाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या बैठकीत एमआयएमबाबत चर्चा होईल. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. मनसेसह महाविकास आघाडी सोलापूरमध्ये निश्चित झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी स्पष्ट केले.
→ काँग्रेस, रा.काँ.-शरद गट, शिवसेना-उद्धव, माकप, मनसे तसेच वंचित आघाडी व समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे.
→ बाळा नांदगावकर यांच्या परवानगीने मनसेचे नेतृत्व बैठकांना उपस्थित राहिले आणि प्रवेशास ग्रीन सिग्नल मिळाला.
→ बैठकीत एमआयएमला न घेण्याचा प्राथमिक निर्णय झाला असून अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेतला जाईल.
→ महायुती व भाजपसमोर मजबूत आव्हान निर्माण करण्यासाठी आघाडी एकजुटीने निवडणूक लढवत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.