

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
पाटील यांनी सांगितले की, पक्षाने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले आणि “पक्षालाच आमची गरज नाही” अशी भावना झाल्याने त्यांनी पक्ष सोडला.
१९९५ पासून सक्रिय असलेले राजन पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत तीन वेळा आमदारकी मिळवली, मात्र अखेर राष्ट्रवादी सोडावी लागली.
Solapur, 02 November : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण आतापर्यंत राखीव मतदारसंघ असलेल्या मोहोळमधून राजन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला अगदी मोदी लाटेतही निवडून आणण्याचे काम केले होते. मात्र, त्याच राजन पाटलांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. मात्र, पक्ष सोडल्यानंतर राजन पाटलांनी एक खंत व्यक्त केली आहे.
माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil), यशवंत माने, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे यांच्यासह समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. कारण पाटील यांनी अद्यापर्यंत कधीही भाजप अथवा शिवसेनेसारख्या पक्षाची कधीही साथ धरली नव्हती. मात्र, राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षात होणारी कोंडी फोडण्यासाठी त्यांनी पक्षांतरांचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्या पक्षातून मी राजकारणाची सुरुवात केली. त्या पक्षात शेवटपर्यंत राहावं, अशी माझी मनोमन इच्छा होती. परंतु कदाचित पक्षालाच आमची आवश्यकता नाही, असं वाटत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) आणि पक्षनेतृत्वाने आमच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. आमची मानहानी होईल, अशा ठिकाणी दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्या लक्षात आलं की कदाचित पक्षालाच आमची आवश्यकता नाही. म्हणून दुर्दैवाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कारण राजन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे सांगितले.
मोहोळ तालुक्यात माझ्या अगोदर माझे वडिल आणि त्यांच्यानंतर मी सत्ता असो किंवा नसो आम्ही तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मतदारांना कधीही फसवून अथवा अपप्रचार करून त्यांच्या मतांचा मी फायदा घेतलेले नाही. तालुक्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा केल्याचे बक्षीस म्हणूनच आमच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मोहोळ तालुका उभा राहत आला आहे, असा दावाही राजन पाटील यांनी केला आहे.
राजन पाटील हे मोहोळ मतदारसंघातून १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेला पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तिकिट देण्यासाठी पुढाकार घेतला होता. पुढे १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राजन पाटलांनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे दोन वेळा ते राष्ट्रवादीच्या घड्याळावर आमदार झाले.
पुढे मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राजन पाटील यांनी पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. मात्र, ज्या पक्षात राजकारणाची सुरुवात झाली, त्या पक्षात शेवटपर्यंत राहण्याची राजन पाटील यांची इच्छा अपुरी राहिल्याचे दिसून येते. कारण पक्ष नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याचे सांगण्यात आहे.
Q1. राजन पाटील यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
A1. त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
Q2. राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली?
A2. पक्ष नेतृत्वाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले आणि मानहानी झाल्याची भावना झाल्याने त्यांनी पक्ष सोडला.
Q3. राजन पाटील यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे?
A3. ते 1995 मध्ये काँग्रेसमधून आमदार झाले आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडून आले.
Q4. त्यांच्या भाजप प्रवेशाचा राजकीय परिणाम काय मानला जातो?
A4. त्यांच्या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.