Mohol Constituency : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय नेत्यालाही हवीय तुतारीची उमेदवारी!

Assembly Election 2024 : राजू खरे हे गेली दोन महिन्यांपासून मोहोळ मतदारसंघामध्ये गाठीभेटी घेऊन प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील, असा त्यांना विश्वास होता.
Raju Khare-Sharad Pawar
Raju Khare-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 September : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना नेते, उद्योजक राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महायुतीमध्ये मोहोळ मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर खरे यांनी आपला मोर्चा तुतारीकडे वळवला आहे. त्यातूनच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेत उमेदवारी मागणी केली आहे. मात्र, तुतारीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? हा खरा प्रश्न आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी (Mohol Assembly Constituency) महाविकास आघाडी आणि महायुतीकडे इच्छुकांची भलीमोठी यादी दिसून येत आहे. मात्र, मोहोळमध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे यशवंत माने (Yashwant mane) हे आमदार आहेत. त्यामुळे मोहोळ मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, हे निश्चित आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने (NCP) मोहोळ मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार यशवंत माने यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे, त्यामुळे सुमारे महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आमदार यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे महायुतीमधील इच्छुकांची कोंडी झाली असून त्यांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती राजू खरे (Raju Khare) यांचाही समावेश आहे.

Raju Khare-Sharad Pawar
Prashant Paricharak : ‘मला माढ्यात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची का?’; प्रशांत परिचारकांचे पंढरपुरातून लढण्याचे संकेत

राजू खरे हे गेली दोन महिन्यांपासून मोहोळ मतदारसंघामध्ये गाठीभेटी घेऊन प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील, असा त्यांना विश्वास होता. मात्र, यशवंत माने यांच्या उमेदवारीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्यामुळे राजू खरे यांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोळमधील इच्छुकांचा ओढा तुतारीकडे आहे. त्यातूनच राजू खरे यांनी शरद पवारांची भेट घेत विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपतून राष्ट्रवादीत आलेले संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम हेही प्रबळ दावेदार आहेत.

Raju Khare-Sharad Pawar
Sharad Pawar NCP : तुतारीवर विधानसभा लढण्याची 1350 जणांची इच्छा; अहिरेंच्या देवळालीतून सर्वाधिक इच्छूक!

याशिवाय माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे हेही तुतारीकडून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे तुतारीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याकडे मोहोळ मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com