

Solapur, 01 May (प्रदीप बोरावके) : गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग देवांच्या नावाखाली अदानींसारख्या ‘महादेवां’साठी केला जात आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण घालत आहेत. या अनावश्यक महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवर १ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोझा टाकला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपार केल्याशिवाय राज्यातील जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, नव्याने प्रस्तावित असलेला हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील १२, पंढरपूर तालुक्यातील ६ आणि माळशिरस तालुक्यातील १२ गावांतून जाणार आहे. पुढे तो सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या तीनही तालुक्यांतील शेतकरी द्राक्षे, ऊस, केळी आणि भाजीपाला यांसारखी नगदी पिके घेतात. सध्या या सर्व गावांना कोल्हापूर, सातारा आणि नागपूरला जाण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध असताना, सुपीक जमिनीतून नवा रस्ता नेण्यास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी पालखी महामार्ग आणि रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामाला कधीही विरोध केला नाही.मात्र, शक्तीपीठ महामार्गाचे स्वरूप वेगळे असून त्याची टोल वसुली करण्यासाठी किमान ९० वर्षांचा कालावधी लागणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला.
हा महामार्ग 'एक्सप्रेस हायवे' स्वरूपाचा असून त्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती असतील. ८०० किलोमीटरच्या या प्रवासात केवळ २३ ठिकाणीच महामार्गावर येण्या-जाण्याची सोय असल्याने स्थानिकांसाठी तो कुचकामी आहे. पण, शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.