

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र एकला चलोच्या भूमिकेत असलेल्या राजू शेट्टी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तो निर्णय मागे घ्यावा लागला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढण्याचा निर्धार करण्यात आला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्यात आली.
जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, 'दत्त'चे संचालक अनिलराव यादव, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, चंगेजखान पठाण यांची बैठक झाली.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच विकासाचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढणार आणि जिंकणार आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही याच पद्धतीने लढवल्या जाणार आहेत. जयसिंगपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामाही प्रचाराच्या काळात केला जाईल. जयसिंगपूरच्या नागरिकांना बदल हवा आहे. असे सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून सोळा हजार लोकप्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही लोकशाहीची दोन चाके आहेत. मात्र राज्यातील अनेक पालिकांमध्ये प्रशासनावर दबाव टाकून लोकप्रतिनिधींनी मनमानी कारभार केला. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्वच निवडणुकांमध्ये याच पद्धतीने सामोरे जाणार आहे.
राजू शेट्टी यांच्याबरोबर दोन-तीन बैठकाही झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र राहणार आहे. लोकप्रतिनिधी जमीनी लाटत असताना सर्वसामान्यांनी आठवड्याने एकदा तरी सातबारा पहावा अशी टीका करत राज्यातील नेत्यांच्या कारनामांचा त्यांनी पंचनामा केला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वानुमते निवडण्यात येणार आहे. भ्रष्टाचार, प्रस्थापितांचे कारनामे प्रचारात उघड करू असा इशारा त्यांनी दिला.
राजू शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर पालिकेत नगराध्यक्ष, दहा नगरसेवक निवडून दिले होते. आता तर आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील आम्ही एकत्र आहोत. आता पालिकेत परिवर्तन घडवू. जयसिंगपूर पालिकेत सत्ताधाऱ्यांनी अनेक कारनामे केली आहेत. राजकारणाची दुकानदारी चालवली आहे. ही दुकानदारी या निवडणूकीत बंद पडेल. शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नावाखाली निवडणुका लढवल्या जातील. भुयारी गटार, पालिकेची प्रशासकीय इमारत, प्रॉपर्टी कार्ड, शहरानजीक जमिनीवर आरक्षण टाकून त्या विकत घ्यायच्या आणि यातून लोकांना लुटायचे या सगळ्या प्रकारांचा पडदा फास प्रचाराच्या काळात करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.