

Solapur, 14 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत विविध घडामोडींना वेग येत आहे. निवडणुकीसाठी एकूण २१६५ ठराव झाले असून प्रारुप मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह त्यांचे बंधू आणि पुतण्याचाही मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव झाला आहे, त्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी दिलीप सोपलही बॅंकेत दिसणार का?, याची उत्सुकता जिल्ह्याला आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे, त्यामुळे आमदार सोपल यांचे काय होणार? या बद्दल जिल्ह्याच्या राजकारणाला उत्सुकता होती. मात्र, आमदार सोपल यांचे बॅंकेतील आव्हान कायम राहिले आहे.
डीसीसीच्या निवडणुकीत आमदार सोपल यांच्यासह त्यांचे बंधू सुधीर सोपल यांचेही मतदार प्रतिनिधी म्हणून नागरी बॅंका, पतसंस्था व इतर संस्था मतदारसंघातून ठराव झाले आहेत. आमदार सोपल यांचे पुतणे योगेश सोपल यांचा पणन प्रक्रिया मतदारसंघातून ठराव झाल्याचे समजते, त्यामुळे आमदार सोपल किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिल्हा बँकेत इतर मतदारसंघातून येऊ शकतात.
नागरी बँका मतदारसंघातून यापूर्वीच आमदार सुभाष देशमुख, भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांचा ठराव झालेला आहे. या मतदारसंघातून २०१५ मध्ये माढ्याचे तत्कालीन आमदार बबनराव शिंदे संचालक झाले होते. आता त्यांच्या कुटुंबातून या मतदारसंघासाठी त्यांचे चिरंजीव तथा माढा पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांचा ठराव झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मोठी चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
नागरी बॅंका, पतसंस्था व इतर संस्था मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरणार
सोसायटी मतदारसंघाप्रमाणेच नागरी बॅंका, पतसंस्था व इतर संस्था मतदारसंघ प्रतिष्ठेचा होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून अनेक बड्या नेत्यांचे ठराव झाले आहेत, या मतदारसंघासाठी माजी सहकार मंत्री तथा भाजपचे आमदार सुभाष देशमुख, भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव विक्रमसिंह शिंदे यांचे ठराव झाले आहेत. त्यामुळे सोसायटीपेक्षा नागरी बॅंका, पतसंस्था व इतर संस्था मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.