Solapur, 17 August : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा सांगण्याची चढाओढ सुरू आहे. आघाडीमध्ये सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, तर युतीमध्ये शिवसेना शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची.
आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मिळावा, यासाठी ठराव केला आहे. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघासाठी महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही रस्सीखेच सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नाईकवडी (Idris Naikwadi) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी भवनात त्यांनी सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक घेतली.
त्या बैठकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) सोडण्यात यावा, असा ठराव करण्यात आला. आगामी विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. त्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली.
सोलापूर शहरात विशेषतः सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात (Solapur city central assembly constituency) मुस्लीम समाजाची संख्या मोठी आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला सोडवून घ्यावा, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीच्या बैठकीत करण्यात आला.
दरम्यान, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेण्याची सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांची मागणी राज्य स्तरीय बैठकीत आग्रहाने मांडण्यात येईल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष ईद्रीस नाईकवडी यांनी सोलापूरमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार जोपर्यंत सत्तेत आहेत, तोपर्यंत अल्पसंख्याक समाजावर अन्याय होणार नाही. अजित पवार नेहमीच अल्पसंख्याक समाजासाठी धावून जातात. अल्पसंख्याक समाजाचे भवितव्य अजितदादाचं उज्वल करू शकतात, असा दावाही नाईकवडी यांनी केला.
महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले माजी आमदार नरसय्या आडम यांनीही आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शहर मध्य मतदारसंघाची मागणी केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. मुळात हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसकडून सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे या मतदारसंघातून इच्छूक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.