Solapur, 01 July : सोलापूरमध्ये भाजपचा रविवारी (ता. 30 जून) ऋणानुंबध मेळावा झाला, त्यात भाजपच्या बहुतांश वक्त्यांनी आमदार राम सातपुते यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी विनंती केली. देवेंद्र कोठेंनीही ‘रामभाऊंच्या पाठीशी ताकदीने उभे राहू’ असा शब्द दिला. त्यावर आमदार सातपुते यांनी ‘आपण सध्या माळशिरसच्या जनतेची सेवा करतोय आणि त्यात मी आनंदी आहे,’ असे सांगून ‘सोलापूर शहर मध्य’मधून लढण्याची ऑफर नाकारत माळशिरसमधून लढण्याचे संकेत दिले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे तब्बल 25 दिवसांनंतर सोलापूरमध्ये (Solapur) रविवारी आले होते. भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा ऋणानुंबध मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना राम सातपुते यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची ऑफर नाकारली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे सलग तीन वेळा निवडून आलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून त्यांना अवघे 796 मतांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसला मोठी आघाडी घेण्यापासून रोखल्यामुळे भाजपमधील विधानसभा इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ दिसून येत आहे. मात्र, युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला आहे, त्याचाही प्रश्न असणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव का झाला, याचे सविस्तर विश्लेषण या वेळी करण्यात आले. पराभवाची कारणं शोधताना बहुतांश वक्त्यांनी आमदार राम सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणूक सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवावी, अशी गळ घातली. यामध्ये सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख समर्थकही होते.
भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र कोठे हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यांनी या मतदारसंघात संपर्क कार्यालयही सुरू केले आहे. त्यामुळे कोठे यांची कोंडी करण्याचाही पक्षांतर्गत प्रयत्न असू शकतो.
देवेंद्र कोठेही यांनी आपण राम सातपुते यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत कोणताही शब्द दिलेला नाही. फडणवीसांनी आदेश दिला तर रामभाऊंच्या मागे कोठे परिवार ताकदीने उभा राहील, असा शब्दच देवेंद्र कोठे यांनी सातपुते यांना दिला.
सोलापूर शहरातील कार्यकर्त्यांकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी होत असलेला आग्रह राम सातपुते यांनी नम्रपणे नाकारला. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटायला मी सोलापुरात आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, ते त्या बोलून दाखवतात. पण, मी सध्या माळशिरसच्या जनतेची सेवा करतोय आणि त्यात मी आनंदी आहे, असे सांगून शहर मध्य मतदारसंघाची ऑफर एक प्रकारे नाकारल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.