Vote Counting
Vote CountingSarkarnama

Solapur, Madha Lok Sabha Result : सोलापूर, माढ्याचा निकाल दुपारी तीनपर्यंत हाती येणार; पोस्टल मतदान अगोदर मोजणार

Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभेसाठी 3 हजार 511 पोस्टल मतदान झाले आहे. ते आठ टेबलवर मोजले जाणार आहे. माढ्यात सहा हजार 971 पोस्टल मतदान झाले आहेत. या मतांची मोजणी 26 टेबलांवर होणार आहे.

Solapur, 03 June : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या (ता. ४ जून) सकाळी आठपासून सुरू होणार आहे. सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. साधारणपणे दुपारी तीनपर्यंत दोन्ही मतदारसंघाचे निकाल हाती येतील, असे सोलापूरच्या निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले.

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar), तर सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यात तुल्यबळ लढत झाली. दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत. मतदानोत्तर कल चाचणीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात उद्या सकाळच्या काही फेऱ्यांमध्येच निकालाचा अंदाज येणार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष मोजणीकडे दोन्ही मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोस्टल मतमोजणीसाठी रामवाडी येथील गोदामातच स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेसाठी 3 हजार 511 पोस्टल मतदान झाले आहे. ते आठ टेबलवर मोजले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र 40 कर्मचारी असणार आहेत. माढ्यात सहा हजार 971पोस्टल मतदान झाले आहेत. या मतांची मोजणी 26 टेबलांवर होणार आहे. त्यासाठी सुमारे 130 कर्मचारी असणार आहेत.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. एका टेबलसाठी चार कर्मचारी नियुक्त असणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभेसाठी 24, सोलापूर शहर उत्तरसाठी 20, सोलापूर शहर मध्यसाठी 27, अक्कलकोटसाठी 27, सोलापूर दक्षिणसाठी 26 तर पंढरपूर विधानसभेसाठी मतमोजणीच्या 25vफेऱ्या होणार आहेत. सर्वात कमी 20 फेऱ्या ह्या सोलापू्र शहर उत्तर मतदारसंघासाठी होणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी सर्वाधिक 27 फेऱ्या होणार आहेत. त्याखालोखाल करमाळा, माढा, माळशिरस व फलटण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 25 फेऱ्यांतून होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी सर्वात कमी 22 फेऱ्या होणार आहेत.

मतमोजणीसाठी प्रत्येक तीन विधानसभा मतदारसंघासाठी एका निरीक्षक असणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, सोलापूर शहर उत्तर व सोलापूर शहर मध्यसाठी मिथिलेश मिश्रा हे निरीक्षक असणार आहेत. राजीव कुमार रॉय हे अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व पंढरपूर विधानसभेचे निरीक्षक असणार आहेत. माढा लोकसभेतील माढा, सांगोला मतदारसंघासाठी रूपाली ठाकूर, तर माळशिरस, फलटण, माणसाठी नारायणचंद्रा बिश्वास हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com