Rupali Chakankar Case : चाकणकर प्रकरणात न्यायालयाचा तिघांना झटका! अंतरिम जामीन अर्ज फेटाळले; अंधारे, ठोंबरे यांच्या नावांची पुन्हा चर्चा!

Rupali Chakankar Social Media Defamation Case : रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात सपना राऊत, मिलिंद गोरे, भूषण पाटील यांना धक्का बसला असून या तिघांचे अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तीन जणांना न्यायालयाने धक्का दिला आहे. सपना राऊत, मिलिंद गोरे आणि भूषण पाटील या तिघांचे अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे चाकणकर यांच्याविरोधातील सोशल मीडिया टीका प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणात १९ जणांविरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एफआयआरमधील आरोपींच्या नावांवरूनही वाद निर्माण झाला होता. एफआयआरच्या कॉलम ७ मध्ये केवळ मिलिंद मारुती गोरे आणि सपना नंदकिशोर राजपूत या दोघांचीच आरोपी म्हणून नोंद असल्याचा दावा या प्रकरणातील वकील अॅड. जतीन आढाव यांनी केला होता. तर सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांची नावे आरोपींच्या रकान्यात नसून तक्रारदाराच्या कथनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

तिघांचे जामीन अर्ज फेटाळले

या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील, काँग्रेसच्या संगीता तिवारी यांच्यासह १९ जणांविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. संबंधितांना न्यायालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही जणांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, सपना राऊत, मिलिंद गोरे आणि भूषण पाटील यांच्या अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने तिन्ही अर्ज फेटाळले.

Rupali Chakankar
Rupali Chakankar On Ardhapur Case: अर्धापूर बलात्कार प्रकरणात पोलीस पाटील-उपसरपंचांशी संबंधित लोक असल्याचा आरोप

'महिलेची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही नाही'

रूपाली चाकणकर यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अॅड. जयश्री पालवे यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "महिलेची बदनामी करणे किंवा तिच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणे, हा कोणालाही अधिकार नाही. महिलेचे चारित्र्य अत्यंत मौल्यवान असते. या प्रकरणातील आक्षेपार्ह वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन आम्ही न्यायालयासमोर आमची बाजू मांडली."

या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल झाल्याचा दावा काही जणांकडून केला जात होता. मात्र, तीन जणांचे अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने या दाव्याला उत्तर मिळाले असल्याचे पालवे यांनी सांगितले. न्यायालयात चाकणकर यांची बाजू मांडण्यात यश आल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयातही दावा दाखल करण्यात आल्याची माहिती अॅड. पालवे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

कथित भोंदू अशोक खरात याच्यावर महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्याचदरम्यान रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Rupali Chakankar
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, म्हणाल्या, ‘राजकारणात चढउतार, काम सुरूच...'

त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्ससह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाकणकर यांच्याविरोधात पोस्ट करण्यात आल्या. या पोस्टमध्ये अश्लील, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप करत पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.