

Mahayuti Politics : महायुतीमध्ये मंत्रिपदावरून पुन्हा एकदा नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यावरून थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी, ‘बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले’ आणि ‘आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर ही काय वाईट वेळ आलीय,’ असे म्हणत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ते रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली असून, सदाभाऊ खोत यांनी महायुतीला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रयत क्रांती संघटनेची ऊस आणि इथेनॉल परिषद सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे पार पडली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदं आणि घराणेशाहीच्या राजकारणावर आपली तीव्र खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी, "वाड्यातले प्रस्थापित सरदार देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, त्यांना मिठी मारली अन् मंत्रिपदं पदरात पाडून घेतली. आपण मात्र फक्त बघतच बसलो," अशा शब्दांत सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. तसेच त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत, ‘आपल्यावर काय वाईट वेळ आलीय,’ असेही म्हटले आहे.
....आणि मंत्री झाले
तसेच या सभेत सदाभाऊ खोत यांनी शेतकरी प्रश्नांवर आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत शेलक्या शब्दांत भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुकदेखील केले. यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन करताना, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फाटका माणूस तळातून वर येतो आणि दीडशे आमदारांचा नेता होतो. आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा आमचा विजय आहे.’
‘पण आता पडळकरसाहेब, वाड्यातले हे सरदार फडणवीस यांच्या पायाला लागले. ते मिठी मारू लागले आणि मंत्री झाले. मात्र, आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आली. पण आम्ही तुमचंच आहोत,’ अशी खंत खोत यांनी व्यक्त केली आहे.
नेत्यांच्या चौकशीची मागणी
यावेळी खोत यांनी सरकारकडे काही नेत्यांच्या कथित कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, या गड्यांना आत घ्या, यांना तेल लावून चांगलं मालिश करा. त्यांनी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने कसे खाल्ले, याचा रिपोर्ट करा.’ या सर्व प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केला, असा आरोपदेखील खोत यांनी केला आहे.
अलीबाबाची गुहा
याचवेळी खोत यांनी बँकेच्या संचालकपदावरूनही टोला लगावला असून, ‘आमदारालादेखील बँकेत संचालक व्हावं असं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा असून, त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडता येतं,’ असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.