Solapur : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भिडे यांच्या विधानानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मोर्चे, आंदोलनं अशा जमेल त्याप्रकारे ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील सत्ताधारी- विरोधकांमध्ये भिडेंवरून राजकीय खटके उडत आहेत.
याचवेळी सोलापुरात भिडे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या आंदोलनावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद अधिवेशनातही उमटले. मात्र, आता राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन यांनी दिले.
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सुमारे १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही वेळातच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर येऊन जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हिंदू के घर में, अशा घोषणाबाजी केली. तसेच ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली. अखेर रस्ता अडविणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जची कारवाई करावी लागली.
पोलिसांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत ओंकार बालाजी सराटे, साईप्रसाद अवधूत दोशी, दिनेश मनोज मैनावाले, विशाल राजू जाधव, अभिषेक बसवराज नागराळे, किरण रणजित पंगूडवाले, चंद्रकांत उमेश नाईकवाडे, संभाजी उमेश आडगळे, प्रेम विश्वनाथ भोगडे, अविनाश बाबूसिंग मदनावाले यांच्यासह ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे स्थानिक आमदार विजय देशमुख(Vijay Deshmukh) यांनी सोलापूर येथील भिडे समर्थक आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जप्रकरणी आज विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देशमुख यांच्या मागणीची दखल घेत चौकशी करण्याचे जाहीर केले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.